जळगाव विधानपरिषद जागेवरून भाजप-शिवसेना आमनेसामने



जळगाव : विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपापले दावे ठामपणे मांडल्याने राजकीय वातावरण तापले असून, मैत्रीपूर्ण लढतीचीही शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही जागा शिवसेनेला सोडावी आणि त्यांचे पुत्र प्रताप पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. मात्र, भाजपने या जागेवर आपला हक्क कायम ठेवत जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महायुतीच्या प्राथमिक जागावाटपाच्या सूत्रानुसार भाजप १२, शिवसेना ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाच्या आधारावर जागा वाटप करण्याचे सूत्र ठरल्याने जळगावची जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता अधिक असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, भाजपकडून नंदूकुमार अडवाणी, नंदकिशोर महाजन आणि अमोल शिंदे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. तर शिवसेनेकडून प्रताप पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. पाचोरा-भडगाव परिसरात शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर स्थानिक कार्यकर्त्यांचा दावा अधिक बळकट झाल्याचेही दिसून येत आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. अंतिम जागावाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून, पुढील काही दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या तरी जळगावची जागा कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


जळगाव विधानपरिषद जागा शिवसेनेलाच हवी

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या जागेवरून महायुतीत सुरू असलेल्या संघर्षाला आणखी धार चढली आहे. “उमेदवारी कुणालाही मिळाली तरी चालेल, मात्र जागा शिवसेनेलाच मिळायला हवी,” अशी ठाम भूमिका आमदार किशोर अप्पा पाटील यांनी मांडली आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढत असल्याचा दावा करत, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि अलीकडील निवडणुकांतील यश यामुळे ही जागा शिवसेनेलाच देणे योग्य ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.



 

 


Post a Comment

Previous Post Next Post