ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय प्रथम


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा सन्मान

जळगाव : राज्य शासनाच्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात’ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीबद्दल मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


भारतीय गुणवत्ता परिषद (क्यूसीआय) मार्फत करण्यात आलेल्या सर्वंकष मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० पैकी १८८ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने विविध तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.


या मूल्यमापनात अद्ययावत व वापरकर्ता-अनुकूल संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, ई-ऑफिसचा १०० टक्के वापर, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसेच जीआयएस प्रणालीचा प्रभावी वापर या सात निकषांवर उत्कृष्ट कामगिरी नोंदविण्यात आली.


जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी कार्यक्रमात या उपक्रमांचे सविस्तर सादरीकरण केले. “हे यश जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असून, ते जळगावकर नागरिकांना समर्पित आहे,” असे त्यांनी नमूद केले.


डिजिटल प्रशासनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल जळगाव जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारे ठरणार असून, या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


#JalgaonDistrict #EGovernance #DigitalIndia #MaharashtraAdministration #EaseOfLiving #JalgaonCollector #GovernanceExcellence

Post a Comment

Previous Post Next Post