१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषद राज्यात तृतीय

 


ठाणे : राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषदने राज्यात तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. या कामगिरीबद्दल मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश कुमार तसेच अनेक अधिकारी उपस्थित होते.


या कार्यक्रमांतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचे सात निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये अधिकृत संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ पोर्टल, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ब्लॉकचेन व जीआयएस प्रणालींचा प्रभावी वापर या बाबींमध्ये ठाणे जिल्हा परिषदने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.


मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितले की, डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. या यशात सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या समन्वयपूर्ण कामगिरीचा मोठा वाटा असून, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांच्या प्रभावी कामकाजाचा विशेष उल्लेख त्यांनी केला.


ई-ऑफिस प्रणालीच्या १०० टक्के अंमलबजावणीमुळे कामकाजात गती आली असून, १४ हजारांहून अधिक ई-फाइल्स तयार करण्यात आल्या आहेत. फाइल निपटारा दर ९२.८६ टक्के, तर ई-रिसिप्ट निपटारा ९६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलवरील ९९ टक्के तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यात आले आहे.


नागरिकांसाठी संकेतस्थळ अधिक सुलभ, सुरक्षित व वापरकर्ता-अनुकूल करण्यात आले असून, घरपोच सेवा, रिअल-टाइम डॅशबोर्ड, २४x७ व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट यांसारख्या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच एआय, ब्लॉकचेन आणि जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक स्मार्ट व कार्यक्षम बनविण्यात आले आहे.


या सर्व उपक्रमांमुळे ठाणे जिल्हा परिषदने आधुनिक, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण केला असून, ई-गव्हर्नन्सच्या उद्दिष्टपूर्तीकडे भक्कम पाऊल टाकले आहे. या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post