परिवहन विभागाचा पुढाकार
मुंबई : राज्यातील प्रवासी सेवा अधिक सुसंवादी व प्रभावी करण्याच्या उद्देशाने परिवहन विभागाने अमराठी वाहनचालकांना ‘व्यवहारिक मराठी’ शिकविण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या संक्षिप्त मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
ही पुस्तिका विशेषतः रिक्षा, टॅक्सी तसेच ओला आणि युबेर सारख्या अॅप-आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनचालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या सोप्या व आवश्यक मराठी वाक्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांशी संवाद साधताना भाषेची अडचण येऊ नये आणि सेवा अधिक सुलभ व परिणामकारक व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्रात सेवा देताना स्थानिक भाषेचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले की, ‘व्यवहारिक मराठी’च्या माध्यमातून चालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल व सेवेत गुणात्मक सुधारणा घडेल.
परिवहन विभागाच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, पुढील काळात राज्यभर अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच रिक्षा व टॅक्सीचालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
