१५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू
पुणे : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सुट्ट्या व नवीन शैक्षणिक वर्षाबाबत शिक्षण संचालनालयाने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, राज्यातील सर्व शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात येणार असून, नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे.
शासनाच्या या आदेशानुसार राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये ही सुट्टी लागू राहणार आहे. मात्र, काही ठिकाणी आवश्यक शैक्षणिक उपक्रम सुरू असल्यास किंवा विशेष परिस्थिती असल्यास सुट्टीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित शाळा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
तसेच, जून महिन्यातील वाढत्या उष्णतेचा विचार करून १५ जून ते १९ जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात (सकाळी ७ ते ११.४५) भरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर ३० जूनपासून शाळा नियमित वेळेनुसार सुरू राहतील.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना सुट्ट्यांचे नियोजन करता येणार असून, शाळांनी शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
