मीरा-भाईंदरच्या वाहतुकीत नवा अध्याय



मेट्रो ९ चा पहिला टप्पा लोकार्पित; १९.७९ किमीचा मार्ग प्रवाशांसाठी खुला

मीरा-भाईंदर : दहिसर ते मीरा-भाईंदर (काशिगाव) या मेट्रो ९ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रकल्पामुळे मीरा-भाईंदरच्या वाहतूक व्यवस्थेत नवा अध्याय सुरू झाला आहे.


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. २००९ साली मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो आणण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करत हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा आणि विविध स्तरांवर केलेल्या प्रयत्नांमुळे अखेर मेट्रो सेवा सुरू झाली आहे.


या मेट्रो मार्गिकेमुळे दहिसर ते काशिगाव दरम्यानचा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी झाला असून, अंधेरीपर्यंतचा प्रवासही अधिक सुलभ होणार आहे. मेट्रो ७ आणि मेट्रो ९ यांच्या जोडणीमुळे गुंदवली ते काशिगाव असा थेट सुमारे १९.७९ किमीचा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे.


वेळापत्रक जाहीर

मेट्रोची पहिली गाडी पहाटे ५:५० वाजता सुटणार असून शेवटची गाडी रात्री ११:०० वाजेपर्यंत धावणार आहे. गर्दीच्या वेळेत दर ५ ते ६ मिनिटांनी, तर इतर वेळी ८ ते १० मिनिटांच्या अंतराने गाड्या उपलब्ध असतील.


या कार्यक्रमास मंत्री मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, आमदार नरेंद्र मेहता, प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेट्रो ९ मुळे मीरा-भाईंदरच्या विकासाला चालना मिळणार असून, वाहतूककोंडी कमी होऊन प्रदूषणातही घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




#DevendraFadnavis #EknathShinde #AshishShelar #NarendraMehta#PravinDarekar#PrakashSurve#मीरा- भाईंदर #मेट्रो९ #मुंबईमेट्रो #विकास #वाहतूकक्रांती #देवेंद्रफडणवीस #एकनाथशिंदे #महाराष्ट्र

Post a Comment

Previous Post Next Post