ठाणे जिल्ह्यातील पहिल्या तारांगणाचे उद्घाटन
शहापूर : ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण आणि अत्याधुनिक दुर्बिणींनी सुसज्ज वेधशाळा शहापूर येथे साकारण्यात आली असून, या खगोलकेंद्राचे उद्घाटन रविवारी (५ एप्रिल) सायंकाळी उत्साहात पार पडले. खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण आणि आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
निलेश ठाकूर, गिरीश ठाकूर आणि राज छेडा यांनी उभारलेले हे ‘सॅपो’ खगोलकेंद्र ठाणे जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. उद्घाटन प्रसंगी डॉ. विजय महाजन यांच्यासह अनेक खगोलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार दौलत दरोडा यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, “माझ्या मतदारसंघात असे आधुनिक तारांगण उभे राहणे अभिमानाची बाब आहे. या प्रकल्पाला आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल,” असे आश्वासन दिले. तसेच अधिकाधिक नागरिकांनी या केंद्राला भेट देऊन खगोलशास्त्राची माहिती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी आपल्या भाषणात आकाशाचे महत्त्व अधोरेखित करत, “आकाश हे सदैव उघडे असलेले पुस्तक आहे. त्याचा अभ्यास सर्वांसाठी मोफत आणि सहज उपलब्ध आहे,” असे सांगितले. त्यांनी या केंद्रातून खगोलशिक्षणाला चालना मिळावी, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि भविष्यातून शास्त्रज्ञ घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
तसेच त्यांनी खगोलशास्त्र विषयक अभ्यासक्रम विकसित करण्याची गरज अधोरेखित केली आणि या वेधशाळेचा प्रॅक्टिकल प्रशिक्षणासाठी उपयोग व्हावा, असेही सुचविले. तारांगणापर्यंत चांगला रस्ता आणि जवळच्या रेल्वे स्थानकापासून बससेवा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय, महिन्यातून एक दिवस आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शो आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
उद्घाटनानंतर उपस्थितांना तारांगणातील विशेष शो दाखविण्यात आला. वेधशाळेचे छप्पर उघडून अत्याधुनिक दुर्बिणीतून आकाश निरीक्षण करण्यात आले. लेझर पॉइंटरच्या सहाय्याने ध्रुवतारा, सप्तर्षी यांसारख्या तारकांचे दर्शन घडविण्यात आले. तसेच दुर्बिणीतून गुरू ग्रह आणि त्याच्या चार चंद्रांचे निरीक्षण करून खगोलप्रेमींना अनोखा अनुभव देण्यात आला.
या उपक्रमामुळे शहापूर खगोलशास्त्राच्या नकाशावर ठळकपणे झळकणार असून, ‘ग्रह-नक्षत्रांची बाग’ फुलवणाऱ्या ठाकूर बंधूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.


