बालमोहनचे लाडके ‘अटाळे’ सर काळाच्या पडद्याआड

 


मुंबई : दादर येथील बालमोहन विद्यामंदिरचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक, विद्यार्थ्यांचे लाडके ‘अटाळे’ सर म्हणून ओळखले जाणारे विवेक मधुकर अटाळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच माजी आणि विद्यमान विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अटाळे सर अलिबागवरून पेणकडे कारने येत असताना दुपारी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. या घटनेत त्यांचे निधन झाले. काल संध्याकाळी पेण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


अटाळे सर आणि बालमोहन विद्यालय हे एक अतूट नातं मानलं जात होतं. दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर त्यांच्या शिट्टीच्या आवाजाने शिस्त लागायची, तर त्यांच्या उत्साहाने विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संचारायची. शाळेतील ‘स्पोर्ट्स डे’, बालदिन परेड अशा प्रत्येक उपक्रमात त्यांचा सहभाग आणि उत्साह लक्षणीय ठरायचा.


विशेषतः खो- खो सारख्या भारतीय खेळाला त्यांनी पुन्हा लोकप्रियता मिळवून दिली. स्काऊट- गाईड, आरएसपी आणि शाळेच्या बँडमधील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी घालवलेला वेळ अनेकांच्या आयुष्यातील अमूल्य आठवण बनला आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता.


त्यांचा साधेपणा आणि विद्यार्थ्यांशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. कराटे प्रशिक्षणातही ते इतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये मिसळून जात असत. शाळा सोडल्यानंतरही माजी विद्यार्थ्यांशी ते कायम संपर्कात राहून त्यांची प्रेमाने विचारपूस करत असत.


अटाळे सरांनी विद्यार्थ्यांना केवळ खेळच नाही, तर जीवनातील पराभवानंतर पुन्हा उभं राहण्याची ताकद आणि खिलाडूवृत्तीही शिकवली. त्यांच्या जाण्याने बालमोहन परिवारावर शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांनी एक मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि जिव्हाळ्याचा गुरु गमावला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post