मुंब्रा पोलिसांनी ९० मिनिटांत आरोपींना ठोकल्या बेड्या
दिवा \आरती परब : दिव्यातील साबेगाव परिसरात असलेल्या “श्री खेडादेवी ज्वेलर्स” दुकानावर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोन संशयितांनी दुकान मालकावर धारदार शस्त्राने हल्ला करत दरोड्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकान मालकाने धाडसाने प्रतिकार केल्याने आरोपींना कोणताही सोन्याचा ऐवज लंपास करता आला नाही.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पळताना त्यांनी वापरलेली बॅग आणि काही शस्त्रे जागेवरच टाकून दिल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत परिसरात शोधमोहीम सुरू केली.
दुकानातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवून दिवा परिसरात नाकाबंदी केली. गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी अवघ्या दीड तासात दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
या जलद कारवाईमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या पोलिस आरोपींकडे अधिक चौकशी करत असून, या गुन्ह्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.
मुंब्रा पोलिसांच्या वेगवान तपासामुळे गंभीर गुन्ह्याचा छडा अल्पावधीत लागल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
