मुंबई-बडोदा एक्सप्रेस-वेवर डंपरचा अपघात




मुंबई :  मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कोपर फाटा येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास एक थरारक आणि दुर्मीळ अपघात घडला. चालकाच्या एका क्षणिक दुर्लक्षामुळे भरधाव हायवा डंपरने मुंबई-बडोदा एक्सप्रेस-वेवरील लोखंडी उड्डाणपुलाला जोरदार धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, डंपर चालवताना चालकाकडून चुकून हायड्रोलिक सिस्टीमचे बटण दाबले गेले. यामुळे डंपरचा मागील भाग (टिपर) अचानक वर उचलला गेला आणि पुढे असलेल्या उड्डाणपुलाला धडक बसली. हा प्रकार इतक्या वेगात घडला की चालकाला सावरण्याची संधीच मिळाली नाही.

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी उड्डाणपुलाच्या संरचनेला किरकोळ नुकसान झाले आहे. घटनेनंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, ज्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त डंपर हटवण्यात आला आणि काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली.



Post a Comment

Previous Post Next Post