जिल्हाधिकाऱ्यांची पेट्रोल पंपांवर पाहणी
जळगाव : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण नसून वितरण व्यवस्था पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी आज विविध पेट्रोल पंपांना प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान इंधन साठा, पुरवठा साखळी आणि वितरण व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन अफवांवर विश्वास ठेवू नका, पेट्रोल-डिझेल तुटवड्याबाबत पसरत असलेल्या कोणत्याही अप्रमाणित बातम्यांकडे दुर्लक्ष करावे.अनावश्यक साठवणूक टाळा, इंधन पुरवठा नियमित असल्याने घाबरून जास्त प्रमाणात खरेदी करू नये. शांतता व सहकार्य राखा, इंधन वितरण सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासानाकडून करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपांवर उपलब्ध असलेला साठा, रोजची आवक आणि वितरणाची स्थिती तपासली. जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट झाले. पुरवठा साखळी व्यवस्थित कार्यरत असून इंधन वितरणात कोणताही अडथळा नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
नागरिकांना कोणत्याही अडचणीशिवाय इंधन मिळावे यासाठी पेट्रोल पंप चालकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. विशेषतः अनावश्यक गर्दी होऊ नये, रांगा लागू नयेत आणि सर्व ग्राहकांना वेळेत सेवा मिळावी यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
पेट्रोल पंप परिसरात कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाला योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सतत देखरेख ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने नागरिकांना काही महत्त्वाचे संदेश दिले आहेत जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यकतेनुसारच खरेदी करावी. परिस्थितीवर प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे, असा विश्वास जिल्हा प्रशासन व पोलीस दलाने व्यक्त केला आहे.

