मोरबे धरणातील साठा घटल्याने नवी मुंबईत १०% पाणी कपात लागू

 


नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येत्या सोमवारपासून (२५ मे) १० टक्के पाणी कपात अधिकृतपणे लागू करण्यात येणार असून, वाढते तापमान, वेगाने होणारे बाष्पीभवन तसेच एल-निनो आणि आयओडी (इंडियन ओशन डायपोल) या हवामान घटकांच्या प्रभावामुळे मुख्य जलस्रोत असलेल्या मोरबे धरण येथील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यातील संभाव्य तीव्र पाणीटंचाई टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही कपात लागू केली जात आहे.

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, मोरबे धरणाची एकूण साठवण क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर असली तरी सध्या केवळ ३६.४७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच अवघा १९.११ टक्के इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. हा साठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पाणी कपात लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत शहरातील विविध विभागांमध्ये आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. बेलापूरमध्ये सोमवार व गुरुवार, नेरूळ व कोपरखैरणे येथे मंगळवार व शनिवार, तुर्भे व घणसोली येथे बुधवार व रविवार, तर वाशी येथे गुरुवार व सोमवार संध्याकाळी पाणीपुरवठा बंद राहील. ऐरोली येथे औद्योगिक शटडाऊननुसार शुक्रवारचा दिवस लागू राहणार असून दिघा परिसरातही औद्योगिक वेळापत्रकानुसार कपात लागू केली जाणार आहे.

दरम्यान, सिडको अंतर्गत मोरबे धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या खारघर आणि कामोठे या नोड्सनाही या निर्णयाचा फटका बसणार असून या भागांमध्ये दर शुक्रवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. अतिरिक्त शहर अभियंता (स्थापत्य) अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले की, सध्या पाणीटंचाई नियंत्रणात असली तरी पावसाचे आगमन आणि धरणातील साठा यावर पुढील परिस्थिती अवलंबून राहणार आहे. समाधानकारक पाऊस होईपर्यंत ही कपात कायम राहू शकते.

महापालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे, अनावश्यक वापर टाळण्याचे तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सध्याची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी नागरिकांची जबाबदारी महत्त्वाची असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.





Post a Comment

Previous Post Next Post