अखेर साक्षीचा शोध लागला


१००० सीसीटीव्ही तपासून मुंब्रा- दिवा पोलिसांना यश

दिवा \ आरती परब : दिवा परिसरातून हरवलेल्या ८ वर्षीय साक्षी विजयकुमार पांडे हिचा अखेर सुखरूप शोध लागल्याने कुटुंबीयांसह संपूर्ण दिवा शहराने सुटकेचा निश्वास टाकला आहे. मुंब्रा- दिवा पोलीस स्टेशनच्या पथकाने सलग दोन ते तीन दिवस अहोरात्र मेहनत घेत तब्बल १००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून ही यशस्वी शोधमोहीम पूर्ण केली.

मुलगी हरवल्याची माहिती समोर येताच दिवा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस प्रशासनाने तातडीने विशेष पथके तयार करून दिवा ते बदलापूर परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू केली. विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून मुलीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी कसून प्रयत्न केले.

या मोहिमेत दिवा शहरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. सोशल मीडियासह विविध माध्यमांतून माहिती प्रसारित करून मुलीचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवस- रात्र तपास सुरू ठेवत प्रत्येक धागा तपासला. अखेर अथक प्रयत्नांना यश मिळाले आणि साक्षी पांडे हिचा सुखरूप शोध लागला. मुलगी सुरक्षितपणे सापडल्यानंतर कुटुंबीयांसह नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.

या यशस्वी शोधमोहीमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक नितीन पगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले, अमोल कोळेकर, रोहित केदार, तेजस सावंत, गणेश जाधव, विनायक माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनु शर्मा तसेच दिवा आणि मुंब्रा पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पथकाने मोलाची भूमिका बजावली.

पोलिसांच्या तत्परतेमुळे, नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि सातत्यपूर्ण तपासामुळे एका चिमुकलीला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात यश आल्याने पोलिस दलाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post