डोंबिवलीतील ऐतिहासिक ५२ चाळ रेल्वे मैदानावरील विकासकामाला स्थगिती

 


डोंबिवली \शंकर जाधव :  डोंबिवली पश्चिमेतील हजारो नागरिक, खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचे असे ऐतिहासिक ५२ चाळ रेल्वे मैदान सध्या वाचले असून मैदानावरील सुरू असलेले गेमिंग झोन उभारण्याचे काम तातडीने थांबविण्यात आले आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे आणि आमदार राजेश मोरे यांनी रेल्वे प्रशासनाकडे घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


डोंबिवली पश्चिमेतील ५२ चाळ परिसरातील रेल्वेच्या मालकीच्या या विस्तीर्ण मैदानावर रेल्वे प्रशासनाकडून गेमिंग झोन उभारण्याच्या दृष्टीने काही कामे सुरू करण्यात आली होती. या कामामुळे परिसरातील एकमेव मोठे खुले मैदान नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती. अनेक वर्षांपासून या मैदानावर स्थानिक खेळाडू सराव करत आहेत, नागरिक सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी येतात, ज्येष्ठ नागरिक येथे वेळ घालवतात, तसेच विविध सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांचे हे प्रमुख केंद्र राहिले आहे. मैदानाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्यानंतर स्थानिक नागरिक, खेळाडू आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडले होते. मैदान वाचविण्यासाठी विविध स्तरांवर आवाज उठविण्यात आला. या सर्वपक्षीय आंदोलनाची दखल घेत आणि पाठिंबा देत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तत्काळ हस्तक्षेप करत संपूर्ण विषय गांभीर्याने हाताळण्याचे निर्देश दिले.


त्यांनी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर यांनी रेल्वे प्रशासनाशी जाऊन चर्चा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आमदार राजेश मोरे आणि अभिजित दरेकर यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांच्या भावना आणि मैदानाचे महत्त्व याबाबत सविस्तर चर्चा केली. डोंबिवली पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून मुलांसाठी आणि खेळाडूंसाठी मोकळ्या जागांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत हे मैदान जपणे अत्यंत आवश्यक असल्याची ठाम भूमिका शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनासमोर मांडली. या पाठपुराव्याची सकारात्मक दखल घेत रेल्वे प्रशासनाने सध्या सुरू असलेले काम तातडीने थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मैदान पुन्हा एकदा नागरिकांसाठी खुले झाले असून खेळाडू, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


विशेष म्हणजे, हा विषय केवळ सध्याच्या कामांपुरता मर्यादित न ठेवता भविष्यातही मैदानाचे अस्तित्व कायम राहावे आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने या जागेचा विकास व्हावा यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे स्वतः पुढाकार घेत आहेत. यासंदर्भात ते लवकरच दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार असून ५२ चाळ रेल्वे मैदान कायमस्वरूपी जतन करण्याबाबत आणि त्याचा क्रीडा व सार्वजनिक हितासाठी विकास करण्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहेत.


डोंबिवलीच्या क्रीडा संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले हे मैदान केवळ मोकळी जागा नसून अनेक पिढ्यांच्या आठवणी, असंख्य खेळाडूंची स्वप्ने आणि परिसराच्या सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे मैदानाचे अस्तित्व टिकविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावनांना न्याय मिळाल्याची भावना आता परिसरात व्यक्त होत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे आणि आमदार राजेश मोरे यांच्या पाठपुराव्यामुळे सध्या तरी ५२ चाळ रेल्वे मैदानावरील संकट टळले आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post