पॅरिस : अनुभवी टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने फ्रेंच ओपन स्पर्धेत विजयी सलामी देताना पहिल्या फेरीत दमदार पुनरागमन करत विजय मिळवला. ३९ वर्षीय जोकोविचने स्थानिक खेळाडू जिओव्हानी एम्पेटशी पेरीकार्डचा ५-७, ७-५, ६-१, ६-४ असा पराभव केला.
सुमारे तीन तास चाललेल्या या लढतीत जोकोविचला सुरुवातीला संघर्ष करावा लागला. पहिला सेट गमावल्यानंतर त्याने आपल्या खेळात सुधारणा करत पुढील तीन सेट जिंकले. यजमान देशातील खेळाडूला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे दडपण वाढते, मात्र अशा परिस्थितीत विजय मिळवणे समाधानकारक असल्याचे जोकोविचने सामन्यानंतर सांगितले.
या सामन्यात दीर्घ रॅलीज आणि जोरदार सर्व्हिसेस पाहायला मिळाल्या. प्रतिस्पर्ध्याच्या भक्कम सर्व्हिसवर मात करत जोकोविचने अनुभवाच्या जोरावर सामना आपल्या बाजूने वळवला.
जोकोविचने आपल्या कारकिर्दीत विक्रमी ८२व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभाग नोंदवला असून, यात त्याने रॉजर फेडरर आणि फेलिसियानो लोपेझ यांना मागे टाकले आहे. त्याने आतापर्यंत विक्रमी २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत. फ्रेंच ओपनमध्ये तो २२व्यांदा खेळत असून, २०१६, २०२१ आणि २०२३ मध्ये तो विजेता ठरला आहे.
दरम्यान, महिला एकेरीत चार वेळच्या विजेत्या इगा श्वीऑटेक हिने विजयी सुरुवात करत ऑस्ट्रेलियाच्या इमर्सन जोन्सचा ६-१, ६-२ असा सहज पराभव केला. जॅस्मिन पाओलिनी हिने डायना यस्टेम्सकावर ७-५, ६-३ असा विजय मिळवला, तर एलेना रायबाकिना हिने व्हेरोनिका इयावेचचा ६-२, ६-१ असा पराभव करत पुढील फेरी गाठली.
पुरुष एकेरीत अनुभवी स्टॅन वावरिंका याला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. नेदरलँड्सच्या जॅस्पर डी जोंगने त्याचा ६-३, ३-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. ही वावरिंकाची अखेरची फ्रेंच ओपन स्पर्धा ठरली. तसेच मार्को ट्रुंगेलिटीने प्रभावी कामगिरी करत पुढील फेरीत प्रवेश केला.
