नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी BSNL (बीएसएनएल) ने सर्व आर्थिक अडचणींवर मात करत दमदार पुनरागमन केले आहे. गेल्या दोन वर्षांत व्यवस्थापनातील सुधारणा आणि तांत्रिक उन्नतीमुळे कंपनीच्या कामगिरीत लक्षणीय वाढ झाली असून, महसूल थेट २५,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती कंपनीने अधिकृत निवेदनातून दिली आहे. या कालावधीत महसूलात सुमारे १९ ते २५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २३,४२७ कोटी रुपये आणि २०२३-२४ मध्ये २१,३०२ कोटी रुपये उत्पन्न कंपनीने मिळवले होते.
केंद्रीय राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर यांनी बीएसएनएलच्या प्रगतीचे कौतुक करताना सांगितले की, कंपनीच्या ‘ईबीआयटीडीए’ (EBITDA) मध्येही मोठी झेप पाहायला मिळाली आहे. पूर्वी अवघा ५० कोटी रुपये असलेला नफा आता थेट ७,००० कोटी रुपयांवर पोहोचला असून, ही वाढ कंपनीच्या पुनरुज्जीवनाची साक्ष देणारी आहे.
बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. देशभरातील सुमारे ५०,००० टॉवर्समध्ये बॅटऱ्या बदलून त्यांचे आधुनिकीकरण करण्यात आले असून, पॉवर प्लांट्स अपग्रेड करण्यात आले आहेत. तसेच जुन्या केबल्स काढून नवीन केबल्स बसविण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये टॉवर कार्यक्षमता ७५ टक्क्यांवरून ९५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या सुधारणांनंतर प्रत्येक सर्कल आणि राज्य पातळीवर नवीन मोबाईल कनेक्शन वाढवण्यासाठी स्पष्ट लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
खासगी दूरसंचार कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे प्लॅन्स अधिक परवडणारे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. India Post च्या माध्यमातून अवघ्या १ रुपयात सिम कार्ड उपलब्ध करून देण्याची योजना राबवली जात असून, ग्रामीण भागात पोस्टमन आणि डाक कर्मचाऱ्यांच्या मदतीने जनजागृती मोहीम सुरू आहे.
दरम्यान, बीएसएनएलने केवळ एका वर्षात १ लाख टॉवर्सवर स्वदेशी 4G सेवा सुरू करत महत्त्वाचा विक्रम नोंदवला आहे. या यशामुळे भारत स्वतःचे 4G तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या जगातील मोजक्या देशांमध्ये स्थान मिळवत असून, सरकारी दूरसंचार क्षेत्राला नवी उभारी मिळाल्याचे मानले जात आहे.
