सावंतवाडी तालुक्यात २७ कुटुंबांची स्व-गणना पूर्ण
प्रशासन, महसूल यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या एकजुटीचे यश
सिंधुदुर्गनगरी : स्व-गणना मोहिमेत सावंतवाडी तालुक्यातील पडवे गावाने उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्यातील पहिले पूर्ण स्व-गणना करणारे गाव होण्याचा मान पटकावला आहे. गावातील सर्व २७ कुटुंबांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत स्व-गणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली असून प्रशासन, महसूल यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या प्रभावी समन्वयाचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि मच्छिंद्र सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. नागरिकांपर्यंत स्व-गणनेचे महत्त्व पोहोचवण्यासाठी प्रशासनाने व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली होती. प्रत्येक कुटुंबाने स्वतःहून डिजिटल माध्यमातून आपली माहिती नोंदवून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
मौजे पडवे गावात घरांची एकूण संख्या २५ असून कुटुंबांची संख्या २७ आहे. गावाची एकूण लोकसंख्या ११८ इतकी आहे. या सर्व कुटुंबांनी निर्धारित कालावधीत स्व-गणना पूर्ण करून तालुक्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.
सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी मोहिमेचे सुयोग्य नियोजन करत महसूल विभाग, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात प्रभावी समन्वय साधला. त्यांच्या नेतृत्वाखाली गावपातळीवर प्रत्यक्ष भेटी, माहिती देणे, तांत्रिक मार्गदर्शन तसेच आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होऊन मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला.
या मोहिमेत डेगवे ग्राम महसूल अधिकारी भक्ती सावंत, महसूल सेवक दिक्षा कोरगांवकर तसेच पडवे पोलीस पाटील सुगंधा घारे यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थांशी सातत्याने संपर्क ठेवत स्व-गणना प्रक्रियेतील अडचणी तत्काळ दूर करण्यात आल्या. गावकऱ्यांनीही उत्साहाने आणि जबाबदारीची जाणीव ठेवून सहभाग नोंदविला.
स्व-गणना ही नागरिकांनी स्वतःहून डिजिटल माध्यमातून आपली माहिती नोंदविण्याची प्रक्रिया असून यामुळे जनगणना अधिक पारदर्शक, अचूक आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.


