१३ किलोमीटर रोड प्रकल्पाचे २८ टक्के काम पूर्ण
ठाणे : खारीगाव ते गायमुख दरम्यान उभारला जात असलेला १३ किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड प्रकल्प ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा ठरणार असून, या प्रकल्पामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. आमदार संजय केळकर यांनी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता, कंत्राटदार कंपनीचे अधिकारी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत बाळकुम येथे प्रकल्पाची पाहणी करून कामाचा सविस्तर आढावा घेतला.
सध्या प्रकल्पाचे सुमारे २८ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२८ पर्यंत हा महत्त्वाकांक्षी मार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. खारीगाव, बाळकुम ते गायमुख असा ठाणे खाडीच्या काठाने जाणारा हा सहा पदरी मार्ग सुमारे २,७२७ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येत आहे.
या प्रकल्पामुळे खारीगाव ते गायमुख प्रवासाचा वेळ ४५ मिनिटांवरून थेट १५ मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. तसेच मुंबई-नाशिक महामार्ग, जेएनपीटी, वाढवण बंदर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने होणाऱ्या मालवाहतुकीला जलद जोडणी मिळणार असल्याने या मार्गामुळे ठाण्यासह संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.
घोडबंदर रोडवरील अवजड वाहनांची वाहतूक आणि सातत्याने होणारी कोंडी हा ठाणेकरांसाठी मोठा प्रश्न ठरला आहे. कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच कळवा आणि अंतर्गत भागांतील वाहतुकीलाही मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रकल्पाच्या काही भागात कांदळवन क्षेत्रातून एलिव्हेटेड रोड उभारण्यात येत आहे. पाहणीदरम्यान या परिसरात अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि मातीचा भराव झाल्याचे निदर्शनास आले. ही अतिक्रमणे प्रकल्पासाठी अडथळा ठरू शकतात. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करून अडथळे दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य दिले जाईल, यावर भर देण्यात आल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.
यावेळी संजय पाटील, सुरज दळवी, जितेंद्र मढवी तसेच एमएमआरडीए आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

