आगारनिहाय दरमहा विशेष पुरस्कार आणि आर्थिक प्रोत्साहन
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यभरात डिझेल बचतीसाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
एसटी महामंडळाला सध्या दररोज सरासरी १०.८७ लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासत असून, हा खर्च कमी करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती” या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक आगाराने दररोज किमान पाच लिटर डिझेल बचतीचे उद्दिष्ट निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या माध्यमातून राज्यभरात दररोज सुमारे एक हजार लिटर डिझेलची बचत होऊ शकते, ज्याची आर्थिक किंमत जवळपास एक लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
डिझेल बचतीसाठी सर्व आगारांकडून बसगाड्यांच्या इंधन वापराचे नियमित विश्लेषण करण्यात येणार असून, त्यानुसार आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील. यासोबतच, उत्कृष्ट बचत करणाऱ्या चालकांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहनपर भत्ताही देण्यात येणार आहे. ज्या आगारांनी निश्चित उद्दिष्टांपेक्षा अधिक बचत केली, त्यांना दरमहा विशेष पुरस्कार आणि आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे.
इंधन बचतीसाठी चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून, योग्य वेग नियंत्रण, योग्य गिअरचा वापर, अनावश्यक इंजिन सुरू ठेवणे टाळणे आणि ब्रेकिंग पद्धतीत सुधारणा यावर भर दिला जाणार आहे. ज्या चालकांच्या बसचे किलोमीटर प्रति लिटर (KPL) प्रमाण कमी आहे, त्यांचे समुपदेशन करून पुनर्प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तसेच, बसेसची नियमित तांत्रिक तपासणी, वेळेवर दुरुस्ती आणि इंजिन कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. टायर प्रेशर, इंजिन ट्यूनिंग, ऑईल गळती आणि ब्रेक प्रणालीतील त्रुटींमुळे होणारा इंधन अपव्यय टाळण्यासाठी कार्यशाळा स्तरावर अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
