पालघर : लोकसभेतील प्रभावी कामगिरीबद्दल जाहीर झालेला मानाचा “संसदरत्न” पुरस्कार हा संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघातील जनतेचा असल्याची भावना खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी व्यक्त केली आहे.
हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असला, तरी तो केवळ माझा नसून पालघरच्या माय-बाप जनतेचा आहे. जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद यामुळेच संसदेत त्यांचे प्रश्न ठामपणे मांडण्याची ताकद मिळाली. त्यामुळे हा पुरस्कार मी सर्व पालघरवासीयांना समर्पित करीत आहे, असे त्यांनी सांगितले.
खासदार सवरा यांनी सांगितले की, पालघरच्या जनतेने दाखविलेला विश्वास, पक्षश्रेष्ठींनी दिलेली संधी आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे लोकसभेत मतदारसंघातील प्रश्न प्रभावीपणे मांडता आले.
विकास, रोजगार, पायाभूत सुविधा, शेतकरी, मच्छीमार, आदिवासी बांधव तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविला असून, पुढील काळातही हा लढा अधिक ताकदीने सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सन्मानामध्ये सहकारी कार्यकर्ते, मित्रपरिवार, नातेवाईक, हितचिंतक, पत्रकार तसेच कुटुंबीय आणि आई-वडिलांचे आशीर्वाद यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हा प्रवास शक्य झाला नसता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावुक आहे. चहुबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत असून मन गहिवरून आले आहे. मात्र या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी निश्चितच वाढली आहे,” असे सांगत त्यांनी पुढील काळात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. संसदेमध्ये पालघरच्या विकासाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.