राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन
मुंबई : मुंबईला क्षयरोगमुक्त (टीबीमुक्त) करण्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिष्णु देव वर्मा यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियानाचा शुभारंभ आज सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
या कार्यक्रमात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात योगदान देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियानावर आधारित माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
लोकसहभागातूनच यश शक्य
मुंबईसह उपनगरांची लोकसंख्या जवळपास दोन कोटींच्या घरात पोहोचली असून दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे या अभियानात नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले.
मुंबई टीबीमुक्त झाली तर ती केवळ भारतासाठी नव्हे, तर जगासाठी आदर्श ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. अभियानाच्या विविध टप्प्यांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, रेड क्रॉस, NCC, ‘माय युवा भारत’ स्वयंसेवक, स्काऊट-गाईड आणि विविध सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. टीबी हा योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे. शासनाकडून तपासणी व उपचार मोफत उपलब्ध असून याबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. ‘विकसित भारत’ या उद्दिष्टासाठी देश टीबीमुक्त होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमापूर्वी राज्यपालांनी धारावी येथील एकनाथराव गायकवाड आरोग्य केंद्राला भेट देत डॉक्टर, कर्मचारी आणि आशा सेविकांशी संवाद साधला. तसेच क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण केले. या वेळी राज्यपालांनी ३० क्षयरुग्णांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या उपक्रमाबद्दल मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्यांना ‘निक्षय मित्र’ प्रमाणपत्र प्रदान केले. राज्यपालांच्या हस्ते भारत पेट्रोलियम, न्यारा एनर्जी, अदाणी फाउंडेशन आणि ‘मेट्रोपोलीस हेल्थ’ यांसारख्या संस्थांना क्षयरोग निर्मूलन मोहिमेतील योगदानाबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले.

