व्हाइट हाऊस : अमेरिकेतील व्हाइट हाऊस परिसरात आज पहाटे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत २१ वर्षीय नासिरे बेस्ट (Nasire Best) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मेरीलँडमधील रहिवासी असलेल्या बेस्टने सिक्युरिटी चेकपोस्टजवळ गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल यूएस सीक्रेट सर्व्हिस जवानांनी गोळीबार करत त्याला जखमी केले. रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, New York Post च्या वृत्तानुसार, बेस्ट हा मानसिकदृष्ट्या अस्थिर होता आणि यापूर्वीही तो व्हाइट हाऊस परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना आढळला होता. त्याला व्हाइट हाऊसपासून दूर राहण्याचे न्यायालयाचे आदेशही होते, मात्र त्याने त्याचे उल्लंघन केले होते.
माहितीनुसार, २६ जून २०२५ रोजी बेस्टने वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केल्याने त्याला जबरदस्तीने मानसिक आरोग्य उपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर केवळ दोन आठवड्यांत, १० जुलै २०२५ रोजी त्याने व्हाइट हाऊसच्या प्रतिबंधित प्रवेशद्वारातून नियम मोडून आत जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अटक केल्यानंतर त्याने स्वतःला “येशू ख्रिस्ताचा आधुनिक अवतार” असल्याचा दावा केल्याचेही समोर आले आहे.
आज पहाटे सुमारे ५ वाजता (भारतीय वेळेनुसार) बेस्टने आपल्या बॅगमधून शस्त्र काढून सुरक्षा चौकीवर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. या घटनेत एक सामान्य नागरिकही जखमी झाला असून त्याला लागलेली गोळी संशयिताची की सुरक्षा दलांची, याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही.
गोळीबाराच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) व्हाइट हाऊसमध्येच उपस्थित होते. मात्र, या घटनेत त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
घटनेनंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिकांना या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही घटना काही आठवड्यांपूर्वी व्हाइट हाऊसशी संबंधित एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर घडली असून, अमेरिकेतील सुरक्षेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब मानली जात आहे.
