बुधवारी आझाद मैदान येथे एकदिवसीय लाक्षणिक ठिय्या आंदोलन
पुणे : वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या NEET-UG परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यातील खासगी शिकवणी वर्गांच्या नऊ प्रमुख संघटना एकत्र आल्या असून, बुधवारी (२७ मे) आझाद मैदान येथे एकदिवसीय लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. ‘स्टेट कन्सॉर्शियम ऑफ कोचिंग टीचर्स अँड इन्स्टिट्यूट्स’च्या वतीने ही भूमिका घेण्यात आली असून, संघटनेचे प्रवक्ते बंडोपंत भुयार यांनी याबाबत माहिती दिली.
NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त होत असून या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रियाही सुरू आहे. तसेच २१ जून रोजी फेरपरीक्षा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कोचिंग क्षेत्रातील संस्थांनी एकत्र येत शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्ट साखळीविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनाद्वारे इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेसवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. काही शाळा आणि महाविद्यालयांकडून नाममात्र शुल्क घेऊन विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाते आणि मोठ्या खासगी क्लासेससोबत बेकायदेशीर करार करून आर्थिक गैरव्यवहार केला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शासकीय आणि खासगी शाळांतील शिक्षकांनी खासगी शिकवणी वर्गात शिकवून दुहेरी उत्पन्न घेण्यावर कठोर कारवाई करण्याचीही मागणी संघटनेने केली आहे.
फसव्या जाहिराती करणाऱ्या कॉर्पोरेट कोचिंग संस्थांवर नियंत्रण आणण्याची गरज अधोरेखित करत, विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी सरकारने कोणतेही नवे धोरण लागू करण्यापूर्वी खासगी शिकवणी चालकांना विश्वासात घ्यावे, असेही संघटनेने स्पष्ट केले.
तसेच NEET, JEE सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी शैक्षणिक व्यवस्थेत पुरेशी तरतूद नसल्याचा दावा करत, या परीक्षांना पर्यायी व्यवस्था उभी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पेपरफुटी प्रकरणात सहभागी असलेल्या घटकांवर संबंधित शिक्षक, इंटिग्रेटेड क्लासेस, टाय-अप संस्था यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाईसह कायदेशीर बंदी घालण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. याशिवाय “एक देश, एक परीक्षा मंडळ, एक अभ्यासक्रम, एक परीक्षा” अशी शैक्षणिक समानतेवर आधारित धोरण राबविण्याची मागणीही या आंदोलनातून करण्यात येणार आहे.
