दारूच्या दुकानांसमोरील गर्दीमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
दिवा \ आरती पर : दिवा पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील दारूच्या दुकानांसमोर रात्री होणारी गर्दी, महिलांना होणारा त्रास आणि वाढत्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणरागिणी निकिता सालप यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट रस्त्यावर उतरून संबंधितांना जाब विचारत चोप ही दिला.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दारूच्या दुकानांसमोर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. दारू खरेदी करणाऱ्यांकडून रस्त्यालगत वाहने उभी केली जात असल्याने पादचाऱ्यांना, विशेषतः महिला आणि मुलींना, ये- जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय दुकानांसमोर शेंगदाणे, वेफर्स, चिप्स आदींचे छोटे स्टॉल लागल्याने परिसरात आणखी गर्दी वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर निकिता सालप यांनी रात्री परिसराची पाहणी करत दारूच्या दुकानांसमोर थांबून मद्यपान करणाऱ्यांना फटकारले. महिलांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
स्थानिक नागरिकांच्या मते, या चौकात अनेकदा किरकोळ वाद, भांडणे आणि मारामारीच्या घटनाही घडतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. यापूर्वीही विविध सामाजिक कार्यकर्ते आणि काही राजकीय पक्षांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महिलांच्या छेडछाडीच्या तक्रारी तसेच वाढत्या गर्दीबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसून आली नाही.
दरम्यान, मनसेच्या या भूमिकेनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, दारूच्या दुकानांसमोरील अनधिकृत गर्दी, बेकायदा पार्किंग आणि महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. दिवा चौकातील या समस्येवर पोलीस प्रशासन, महापालिका आणि संबंधित विभाग कोणती ठोस पावले उचलणार, याकडे आता दिवेकरांचे लक्ष लागले आहे.

