महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
दिवा \ आरती परब : दिवा धनगर समाज संघाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त दिवा (पूर्व) येथील दातिवली तलाव परिसरातील गणेश नगर येथे रविवारी भव्य आणि दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजबांधव, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर उत्सवी वातावरणाने भारावून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि समाजहिताच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.
महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकू समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच समाजातील ज्येष्ठ महिलांचा सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी विविध मान्यवरांनी समाजातील शिक्षण, संघटन आणि सामाजिक एकात्मतेच्या विषयावर मार्गदर्शन केले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा इतिहास, त्यांचे समाजासाठीचे योगदान आणि आदर्श जीवनकार्य यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला. युवकांनी इतिहासातून प्रेरणा घेत शिक्षण आणि सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमातील आकर्षण ठरलेल्या गजनृत्याच्या सादरीकरणाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लहान मुलांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. युवकांनी उत्कृष्ट शिस्त आणि नियोजनाचे दर्शन घडवत कार्यक्रमाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. दिवा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्शांवर चालत समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मारोती पडवळकर, कपिल रोडे, अनिल बोडके, प्रकाश गावडे, डी. के. खरात, विजय लांबोरे, राहुल बगरे, नागेश बोडके, शाम खरात, चंद्रकांत झोरे, विकास झोरे, नितीन शिंदे, दीपक झोरे, तुकाराम लांबोरे, प्रकाश तरक, अनिकेत विरकर, शिवाजी सरगर, बाबुराव बगरे आणि कुणाल गुलीके यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. उत्साह, शिस्त, सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा हा जयंती सोहळा दिवा परिसरात विशेष चर्चेचा विषय झाला.
