दिवा \ आरती परब : दिवा शहरातील पश्चिम येथील नागवाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात झाली असून, स्थानिक नागरिकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
हा रस्ता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष निधीतून मंजूर झाला असून, शिवसेना शहरप्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या पाठपुराव्यामुळे कामाला गती मिळाली. तसेच नगरसेवक शैलेश पाटील, नगरसेविका दीपाली उमेश भगत, नगरसेविका स्नेहा अमर पाटील आणि ॲड. आदेश भगत यांनीही या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने मागणी केली होती.
रस्त्याचे काम काही तांत्रिक आणि स्थानिक अडचणींमुळे रखडले होते. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या सहकार्याने मार्ग काढण्यात आला. त्यानंतर आज प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या रस्त्यामुळे नागवाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होणार असून, अंत्यविधीसाठी ये-जा करणे अधिक सुलभ होणार आहे. परिसरातील नागरिकांनी रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक ॲड. आदेश कमलाकर भगत यांनी संबंधित यंत्रणा, स्थानिक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींचे सहकार्याबद्दल आभार मानत, रस्त्याचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
