ठाणे : शासकीय सेवेत कार्यरत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक व सामाजिक आधार मिळावा या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या अनुकंपा नियुक्ती योजनेअंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेत १४ पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले.
जिल्हा परिषद मुख्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते गट (क) व गट (ड) संवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांनी नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करत प्रामाणिकपणे, जबाबदारीने व जनसेवेची भावना जपत कार्य करण्याचे आवाहन केले.
अनुकंपा नियुक्तीसाठी प्राप्त प्रस्तावांची नियमानुसार छाननी करून अंतिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ज्येष्ठता आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात आली. निवड यादीवरील हरकतींचे निराकरण केल्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार उपलब्ध रिक्त पदांवर १४ पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले की, अनुकंपा नियुक्ती ही केवळ नोकरी देण्याची प्रक्रिया नसून कठीण परिस्थितीत सापडलेल्या कुटुंबांना आधार देण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांनी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व जपत ग्रामीण भागातील नागरिकांना संवेदनशीलतेने सेवा द्यावी, असे त्यांनी सांगितले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्यात आल्याचे सांगितले. भविष्यातही शासनाच्या नियमांनुसार अशा प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती पाटील, सहाय्यक प्रशासन अधिकारी नितीन घोडके तसेच सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अनुकंपा नियुक्तीमुळे संबंधित कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार असून शासनाच्या लोकाभिमुख धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.


