झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला अभिजीत दिपके यांचा पाठिंबा
छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पक्ष (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी झारखंडमधील भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सीजेपी आता राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर विविध संस्थांमध्ये उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी 'दबावगट' (प्रेशर ग्रुप) म्हणून काम करेल, असे त्यांनी बुधवारी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथे सीजेपीच्या मुख्य कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना दिपके यांनी सांगितले की, पक्षाचे सदस्य लवकरच झारखंडमध्ये जाऊन आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाठिंबा देतील.
रांचीतील जयपाल सिंह मुंडा स्टेडियम येथे २९ जुलैपासून मोठ्या संख्येने नोकरी इच्छुक विद्यार्थी बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि इतर भरती परीक्षांतील कथित गैरव्यवहारांची राज्याबाहेरील निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची त्यांची मागणी आहे.
दिपके म्हणाले, "लोकांचा न्यायव्यवस्था, राजकारण, माध्यमे आणि निवडणूक आयोगावरील विश्वास कमी झाला आहे. आमच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला. त्यामुळे आता या संस्थांमध्ये उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी जनतेच्या दबावगटाची गरज आहे."
झारखंडमधील आंदोलनाला पाठिंबा देणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी, "आम्ही नक्कीच झारखंडला जाऊ. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक मागणीसाठी त्यांच्या पाठीशी उभे राहू," असे स्पष्ट केले.सीजेपी राजकारणात उतरणार का, या प्रश्नावर दिपके म्हणाले की, "माध्यमेच याबाबत अधिक उत्सुक दिसत आहेत. सध्या भारताला राजकीय पक्षापेक्षा प्रभावी दबावगटाची गरज आहे."
दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाला देशभरातून मिळालेल्या प्रतिसादामुळे संघटनेची जबाबदारी वाढली असून या बैठकीत सीजेपीच्या भविष्यातील विस्ताराचा आराखडा तयार केला जाणार असल्याचे दिपके यांनी सांगितले. माध्यमे, न्यायव्यवस्था, इथेनॉल मिश्रित इंधन आणि वाढती बेरोजगारी यांसारख्या विषयांवरही बैठकीत चर्चा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीदरम्यान दिपके यांनी उपस्थित कार्यकर्ते, पाहुणे तसेच बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांनाही स्वतः चहा वाटप केले.
'सोनम वांगचुक मार्गदर्शक राहतील'
सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी पर्यावरणवादी आणि शिक्षण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे संघटनेचे मार्गदर्शक म्हणून पुढेही राहतील, असे सांगितले. तसेच, नीट पेपरफुटी आणि इतर परीक्षा गैरव्यवहारांविरोधातील आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत पुरविण्यासाठीही सीजेपी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सौरव दास यांच्या घरात घुसखोरीचा आरोप
दरम्यान, सौरव दास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही यूट्यूबर्स आणि माध्यम प्रतिनिधींनी नवी दिल्लीतील त्यांच्या घरात घुसून घरातील दृश्यांचे चित्रीकरण केल्याचा आरोप केला. यामुळे आपल्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा भंग झाला असून सुरक्षेलाही धोका निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले. सीजेपीचे प्रतिनिधी आशुतोष रांका यांनी हा प्रकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. त्यांनी माध्यम भाष्यकार अभिजित अय्यर मित्रा यांच्यावर दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा आरोप करत, पुराव्याशिवाय आरोप सुरू राहिल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावू, असा इशारा दिला.
सीजेपीच्या नेत्या रत्ना सिंह यांनी अभिजित अय्यर मित्रा यांच्याविरोधात यापूर्वीच दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे सांगितले. तसेच, रांका यांनी त्यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली.पंजाब पोलिसांनी जंतरमंतर आंदोलनाशी संबंधित कथित दहशतवादी मॉड्यूलबाबत केलेल्या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना रांका यांनी, "जर असे लोक जंतरमंतरपर्यंत पोहोचले असतील, तर ते सुरक्षा यंत्रणांचे मोठे अपयश आहे," असे म्हटले.
