दातिवली रेल्वे फाटकाची दुरवस्था; अपघाताचा धोका वाढला

 


योगिता हेमंत नाईक यांनी DRM यांची भेट घेऊन दिले निवेदन

दिवा \ आरती परब : दिवा स्थानकाजवळील दातिवली गाव रेल्वे फाटकाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून फाटक परिसरातील रस्ता खड्डेमय झाला आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून वाहनांची चाके खड्ड्यांमध्ये अडकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा फटका मध्य रेल्वेला बसू शकतो म्हणून या रेल्वे फाटकाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका योगिता हेमंत नाईक यांनी मुंबईतील मंडळ रेल प्रबंधक (DRM-CSMT) हिरेश मीना यांची भेट घेऊन दातिवलीगाव रेल्वे फाटकाच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले.


दातिवलीगाव रेल्वे फाटकातून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक तसेच वाहनांची ये-जा होत असते. मात्र फाटक परिसरातील रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताची शक्यता आणखी वाढली आहे.


रेल्वे प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश द्यावेत आणि दातिवली रेल्वे फाटकाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी योगिता हेमंत नाईक यांनी निवेदनाद्वारे केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने विलंब न करता या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post