स्वप्नांना वास्तवात उतरवण्याचा निर्धार
ॲमस्टरडॅम : अनेक वर्षांची मेहनत, संघर्ष, अडथळे आणि संधीची प्रतीक्षा केल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघातील युवा खेळाडू आता विश्वचषकाच्या मोठ्या मंचावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. इशिका, लालथांतलुआंगी, साक्षी राणा, शिल्पी दाबास आणि सुनेलिता टोप्पो या नवोदित खेळाडूंसाठी विश्वचषक संघात स्थान मिळणे हे त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाचे फलित आहे. आता या खेळाडूंचे लक्ष्य केवळ पदार्पण करण्याचे नसून, आपल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला योगदान देण्याचे आहे.
२१ वर्षीय इशिकासाठी भारतीय संघाकडून विश्वचषक खेळणे हे स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. तिचे वडील सुरुवातीपासूनच तिचे प्रशिक्षक राहिले आहेत. कुटुंबाकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल ती कृतज्ञ असून, दुखापती आणि कठीण काळाने तिला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवले असल्याचे तिने सांगितले. प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण करणे आणि गोल करण्याच्या संधी निर्माण करणे ही आपली प्रमुख ताकद असल्याचे इशिकाचे म्हणणे आहे.
२१ वर्षीय बचावपटू लालथांतलुआंगी हिच्यासाठी भारतीय संघाची कॅप मिळण्याचा क्षण भावनिक होता. ही कॅप केवळ तिची नसून तिच्या कुटुंबाचीही असल्याची भावना तिने व्यक्त केली. शालेय शिक्षणासोबत हॉकीचे प्रशिक्षण घेताना तिने लहानपणापासूनच वेळेचे व्यवस्थापन शिकले. वरिष्ठ खेळाडूंनी तिला मोठा आधार दिला असून, दबावाचा सामना कसा करायचा हे त्यांच्याकडून शिकल्याचे तिने सांगितले. विश्वचषकात बचावफळी व्यवस्थित ठेवण्याबरोबरच आक्रमणाची सुरुवात करण्यात योगदान देण्याची तिची भूमिका असेल.
साक्षीचा उत्साह आणि सकारात्मक दबाव
१९ वर्षीय मध्यरक्षक साक्षी राणा पहिल्या विश्वचषकासाठी उत्सुक असून, त्याचवेळी थोडीशी धाकधूकही असल्याचे ती सांगते. मात्र ही सकारात्मक ऊर्जा मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी वापरण्याचा तिचा निर्धार आहे. संघाच्या बचाव आणि आक्रमणातील दुवा म्हणून काम करण्याबरोबरच दोन्ही आघाड्यांवर योगदान देण्याचे तिचे लक्ष्य आहे.
शिल्पी दाबास हिचा विश्वचषकापर्यंतचा प्रवास विशेष ठरला. राष्ट्रीय शिबिरासाठी संधी मिळण्यासाठी तिला बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. हॉकी इंडिया लीगच्या दुसऱ्या हंगामानंतर तिला राष्ट्रीय शिबिरात बोलावण्यात आले आणि त्यानंतर वरिष्ठ संघाचा दरवाजा खुला झाला. कुटुंबातील आई, वडील आणि भाऊ हे तिघेही हॉकी खेळले आहेत. सहावीत असताना हॉकीला सुरुवात करणाऱ्या शिल्पीने टॅकलिंग आणि लांब पासेस हे आपले प्रमुख गुण असल्याचे सांगितले.
सुनेलिताच्या वेगावर भारताची भिस्त
१९ वर्षीय विंगर सुनेलिता टोप्पो हिची नजर भारतीय आक्रमणाला वेग देण्यावर आहे. वेग ही आपली सर्वात मोठी ताकद असून, त्याचा संघाच्या फायद्यासाठी वापर करण्याचा तिचा निर्धार आहे. विंगवरून चेंडू वेगाने स्ट्रायकरपर्यंत पोहोचवून गोलच्या संधी निर्माण करण्याचे तिचे उद्दिष्ट आहे.
या युवा खेळाडूंसाठी विश्वचषकाचा मंच मोठा असला तरी त्यांचा दृष्टिकोन साधा आहे.आतापर्यंत केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवणे, वरिष्ठांकडून मिळालेल्या अनुभवाचा फायदा घेणे आणि देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करणे.
शिल्पीने नवोदित खेळाडूंना संदेश देताना संधी लगेच मिळाली नाही तरी हार न मानता मेहनत सुरू ठेवावी, असे आवाहन केले. सुनेलितानेही आयुष्यात आव्हाने येत राहतील, कधीकधी खेळ सोडून देण्याची इच्छाही होऊ शकते; मात्र स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत सुरू ठेवल्यास त्याचे फळ नक्की मिळते, असा विश्वास व्यक्त केला.
आता या युवा खेळाडूंच्या मेहनतीची खरी परीक्षा विश्वचषकाच्या मैदानावर होणार असून, भारतीय महिला हॉकी संघासाठी त्यांचे पदार्पण आशादायी ठरण्याची अपेक्षा आहे.
