अन्न सुरक्षा व स्वच्छता नियमांचे उल्लंघन; मुंबईतील तीन केंद्रांसह साताऱ्यातील एका आउटलेटवर कारवाई
मुंबई : अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) डॉमिनोज पिझ्झाच्या चार आउटलेटचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये मुंबईतील तीन आणि सातारा जिल्ह्यातील एका आउटलेटचा समावेश आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
मुंबईत विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम येथील आर-सिटी मॉलमधील ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडच्या डॉमिनोज आउटलेटची तपासणी करण्यात आली. विलेपार्ले येथील केंद्रात एफएसएसएआय परवाना प्रदर्शित न करणे, पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था, अन्न साठवणूक, कीड नियंत्रण आणि स्वच्छता सुविधांमध्ये त्रुटी आढळल्या.
गोठवलेल्या अन्नपदार्थांचे तापमान नियमित तपासणे, खाद्य व गैर-खाद्य वस्तूंची स्वतंत्र साठवणूक, उंदीर व कीटक प्रतिबंधक उपाय आणि पुरेशा हात धुण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
बोरिवली येथील आउटलेटमध्ये सुमारे १५ टक्के नियमांचे पालन झाले नसल्याचे तपासणीत आढळले. अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, अन्न तपासणी, स्वच्छता आणि कीड नियंत्रणाबाबत सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. कच्चे व शिजवलेले अन्न तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्र ठेवणे आणि उपकरणे व भांडी नियमित निर्जंतुक करण्यासही सांगण्यात आले.
घाटकोपर येथील आउटलेटमध्ये स्वच्छता, सॅनिटायझेशनचे वेळापत्रक आणि कीड नियंत्रणात त्रुटी आढळल्या. तसेच FIFO आणि FEFO पद्धतींचे पालन, अन्न साठवणुकीतील योग्य तापमान नियंत्रण यामध्येही कमतरता आढळली. खाद्यपदार्थांसाठी आवश्यक फूड-ग्रेड प्रमाणपत्रे तसेच उपकरणांच्या कॅलिब्रेशन, प्रतिबंधात्मक देखभाल, अन्न व पाणी तपासणी आणि अन्न सुरक्षा नोंदी उपलब्ध नसल्याचेही एफडीएने नमूद केले.
सातारा जिल्ह्यातील मलकापूर येथील डॉमिनोज आउटलेटचा परवानाही निलंबित करण्यात आला. येथे सुमारे ४० टक्के नियमांचे पालन झाले नसल्याचे आढळून आले. मूलभूत सुविधा, उपकरणे, स्वच्छता आणि कीड नियंत्रणामध्ये गंभीर त्रुटी आढळल्या.
याच मोहिमेत साताऱ्यातील कराड येथील सॅफायर फूड्स इंडियाच्या दोन फास्ट-फूड आस्थापनांवरही सुधारात्मक उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले. शाकाहारी व मांसाहारी पिझ्झासाठी स्वतंत्र ओव्हन व पॅन, योग्य विभाजन तसेच सॉस व टॉपिंग्जवर पॅकिंग आणि एक्सपायरी तारीख नमूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
१०४ चेन रेस्टॉरंटची तपासणी
एफडीएने राज्यभरातील १०४ चेन रेस्टॉरंटची तपासणी केली. त्यापैकी दोन आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश, ९५ आस्थापनांना सुधारणा नोटिसा तर पाच आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. या मोहिमेत डॉमिनोज, केएफसी, पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड्स, सबवे, बर्गर किंग, स्टारबक्स आणि मॉंगिनीज यांसारख्या नामांकित ब्रँडचा समावेश होता.
नाशिक जिल्ह्यातही पाच खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. मुंबईतील मुलुंड येथील मुंबई मेट्रो ढाबा आणि भांडुप येथील गुलशन-दा-पंजाबी ढाब्यावरही मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी, वायुवीजन, कीड नियंत्रण आणि अन्न साठवणुकीतील त्रुटींमुळे कारवाई करण्यात आली.
एकूण गेल्या काही दिवसांत १२० आस्थापनांची तपासणी, ५४ सुधारणा नोटिसा आणि ११ अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आल्याचे एफडीएने सांगितले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मे महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर अन्न सुरक्षा व स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात राज्यभर कठोर कारवाई सुरू आहे.
