२०३७ पर्यंत एसटीचा ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक

 


सुमारे ५ हजार डिझेल बसेस ठरणार शेवटच्या; २०२७ पासून जुन्या बसेसचे रूपांतर

मुंबई :  महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाचा ताफा सन २०३७ पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात संचालक मंडळाची ३१२ वी बैठक झाली. या बैठकीत एसटीच्या भविष्यातील वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या सुमारे पाच हजार डिझेल बसेस या शेवटच्या डिझेल बसेस ठरणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यात येणार आहे. तसेच सात ते आठ वर्षे वापर झालेल्या जुन्या बसेसचे २०२७ पासून टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या गरजेनुसार नव्या ई-बसेसची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाणार आहे.


ई-बसेसची संख्या वाढत असताना आवश्यक चार्जिंग स्टेशन, विद्युत पायाभूत सुविधा आणि तांत्रिक यंत्रणा उभारण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. आगारनिहाय नियोजन करून ई-बसेसची खरेदी आणि चार्जिंग सुविधा उभारणी या दोन्ही प्रक्रिया समांतरपणे राबविण्यात येणार आहेत.

डिझेलवरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ, हरित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याचा एसटीचा प्रयत्न आहे. सन २०३७ पर्यंत संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ भविष्यात ‘ई-लालपरी’ बनणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post