गरब्याचा खर्च, १० महिन्यांचे मानधन शेतकऱ्यांच्या मदतीला

 


दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिव्यात ‘रास गरबा’ रद्द; अर्चना पाटील यांचा निर्णय

दिवा | आरती परब
MAHARASHTRA WEBNEWS

दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिव्यातील राजे प्रतिष्ठान मंडळाने यंदाचा ‘रास गरबा’ उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवासाठी होणारा खर्च शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका तथा राजे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना निलेश पाटील यांनी दिली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर्श घेत राजे प्रतिष्ठानने हा उपक्रम हाती घेतल्याचे अर्चना पाटील यांनी सांगितले. उत्सवावरील खर्च टाळून तो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. यासोबतच निवडून आल्यानंतर मिळालेले १० महिन्यांचे मानधन, सुमारे १ लाख ५० हजार रुपये, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये जमा करण्याचा निर्णय अर्चना पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे उत्सवाचा खर्च आणि वैयक्तिक मानधन अशा दोन्ही माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा पुढाकार घेण्यात आला आहे.

राजे प्रतिष्ठान मंडळाने यापूर्वीही पूर, दुष्काळ आणि कोरोना महामारीसारख्या संकटांच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविल्याचे अर्चना पाटील यांनी सांगितले. भविष्यातही संकटाच्या काळात जनतेच्या सेवेसाठी प्रतिष्ठान कार्यरत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

“उत्सव पुन्हा साजरे करता येतील; मात्र संकटाच्या काळात शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या सोबत उभे राहणे, हीच खरी सामाजिक सेवा आहे,” असे अर्चना पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post