- तडिपारीचा आकडा शंभरवर जाण्याची शक्यता
डोंबिवली: घरफोडी, चेन स्नॅचिंग व इतर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. अट्टल गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखली जावी याकरिता तडिपारीची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. वर्षभरात कल्याण परीमंडळ 3 परीसरात ११ गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई करत ३८ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. वर्षभरात 96 जणांची तडिपारी करण्यात आली आहे.कल्याण पोलीसांनी खेमा गॅंग, इराणी ,वांग्या , फुलारे, इत्यादी गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याची माहिती कल्याण परिमंडळ -३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.
मोक्का म्हणजे ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा’. संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध प्रस्थापित झाल्यास मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येते. या कायद्यातील तरतुदीनुसार, अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या दहा वर्षांत दोन गुन्ह्य़ांत आरोपपत्र सादर झालेले असणे बंधनकारक आहे. त्यामुळेच या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दाऊद आणि छोटा शकीलला आरोपी बनविले असावे. त्यांच्यामुळे इतर आरोपींना मोक्का लावणे शक्य झाले आहे.' मोक्का’ कायद्यातील २१ (३) या कलमानुसार, आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. मोक्का कायद्याअंतर्गत पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते. तोपर्यंत मोक्काअंतर्गत आरोपींना जामीन मंजूर होत नाही. आरोपीविरुद्ध पोलिसांना ठोस पुरावा सादर करता न आल्यास त्यानंतर जामीन मिळतो. परंतु बऱ्याचवेळा वर्षभरही आरोपींना जामीन मंजूर होत नाही.
दोषींना जन्मठेप आणि पाच लाख रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद आहे.आरोपपत्र दाखल करण्याची मुदत सहा महिन्यांपर्यंत असते. जामीन मिळण्यातही अडचणी येऊ शकतात असे ऍड अनिरुद्ध कुलकर्णी यांनी सांगितले.दरम्यान पोलिसांनी आतापर्यत 96 जणांची तडीपारी पोलीसांनी केली असून वर्षा अखेर हा आकडा 100 गाठेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.