- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
- राज्यातील कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
नागपूर : जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकार्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन, पंचसूत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात विशेष बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रूग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ.7 हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा यावेळी घेण्यात आला.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी कोविड परिस्थितीबाबत सादरीकरण केले. राज्यात सध्या 2216 कोविड रुग्णालये असून 1 लाख 34 हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
चाचण्या, ट्रॅकींग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या सूचना
- चीनमध्ये आढळलेल्या व्हेरिएंट महाराष्ट्रात आढळलेला आहे, त्यामुळे घाबरण्याऐवजी कोविड अनुरुप काळजी आणि लसीकरणावर भर द्यावा.
- मास्क सक्ती नाही- सध्या मास्क सक्ती नसली तरी वृद्ध आणि अतिजोखीम असणाऱ्या लोकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा.
- पंचसुत्रीचा वापर- सर्व जिल्ह्यांनी टेस्ट-ट्रॅक- ट्रिट- व्हॅक्सिनेट आणि कोविड अनुरुप काळजी या पंचसुत्रीचा वापर करावा.
- प्रयोगशाळा आणि चाचण्या वाढवण्यावर भर द्यावा
- 100 टक्के जिनोम सिक्वेंसिंग करावे, कोविड लसीकरण आणि प्रिकॉशन डोसवर भर द्यावा
- सर्व स्तरावर मनुष्यबळाचे प्रशिक्षण आणि क्षमता वाढवण्यावर भर
- आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग आणि रँडम सँपलिंग अतीदक्षता विभाग,रुग्णालये सज्ज ठेवावीत.
- प्रत्येक जिल्ह्याने कोविड तयारीचा आढावा घ्यावा.
