मुंबई: दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांचा चेंबूर येथील बंगला तब्बल १०० कोटी रुपयांना विकला गेला.गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीने ही जागा तब्बल १०० कोटी रुपयांना विकत घेतली. गोदरेज या ठिकाणी आता आलिशान गृहनिर्माण प्रकल्प उभारणार आहे.
चेंबूर येथील टाटा समाजविज्ञान संस्थेच्या आवाराला लागून असलेल्या गल्लीत राज कपूर यांचा हा बंगला एक एकरवर विस्तारला आहे. १९४९ मध्ये त्याची निर्मिती झाली होती. तत्पूर्वी १९४८ मध्ये राज कपूर यांनी बंगल्याला लागून असलेल्या दोन एकर जागेवर आरके स्टुडिओची निर्मिती केली होती. राज कपूर यांच्या या बंगल्याच्या जागेवर आलिशान गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार असून ५०० कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज यांनी व्यक्त केला आहे.