डोंबिवली/ शंकर जाधव : एकीकडे शिंदे- फडणवीस सरकारने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आपली पकड मजबूत करण्यासाठी पाऊले उचलली असताना दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणून समोर उभा ठाकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कल्याण - डोंबिवलीत नवसंजीवनी देणारे जगन्नाथ ( आप्पा ) शिंदे यांनी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडे कल्याण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. आजारपणमुळे पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी शिंदे यांनी राजीनामा दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.पक्ष बांधणीसाठी व मजबुतीसाठी आप्पा शिंदे यांना चेहरा जिल्हाध्यक्ष पद दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाले होते.मात्र शिंदेंच्या राजीनाम्याने पक्षाला उभारी कशी मिळेल अशी चर्चा कार्यकर्त्यामध्ये सुरू झाली आहे.
गेली तीन वर्षे शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष पद सांभाळेल होते.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे.मात्र शिंदे सारखा चेहरा पक्षाला आगामी सार्वत्रिक निवडणुकीत यश मिळवुन देणारा आहे.आता पक्ष जिल्हाध्यक्ष पदाची माळ पुन्हा शिंदेंच्या गळ्यात घालतील का नवीन चेहरा जिल्हाध्यक्ष म्हणून समोर येईल हे अजून गुलदस्त्यात आहे.मात्र शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत.