रमेश बैस यांनी राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारला

 

मुंबई: भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शनिवारी रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून मराठीतून शपथ घेतली. बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यपाल रमेश भाई यांचा मी मनापासून अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो. राज्यपाल यांनी नगरसेवक ते केंद्रीय मंत्री पद त्यांनी भूषवले आहे. प्रशासनाची उत्तम जाण त्यांना आहे. केंद्रीय मंत्रिमंडळामध्येसुद्धा त्यांनी विविध पदांवर काम केले असल्याने त्यांचे मार्गदर्शन महाराष्ट्राला लाभणार आहे. या कारणास्तव महाराष्ट्राच्या उत्तुंग भरारीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी शपथविधी नंतर सिध्दीविनायक मंद‍िरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या घरची मंडळीसुद्धा उपस्थित होती. त्यानंतर राज्यपालांनी महालक्ष्मी मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post