निरलॉन आरएफएस तल्यारखान स्मृती आमंत्रित क्रिकेट स्पर्धा
मुंबई: गतविजेता पारसी जिमखान्याने बॉम्बे जिमखाना लि. आयोजित निरलॉन आरएफएस तल्यारखान स्मृती आमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात यजमान बॉम्बे जिमखान्याचा सात विकेट राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
बॉम्बे जिमखाना मैदानावर गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात गतविजेता पारसी जिमखाना प्रथम क्षेत्ररक्षण निवडताना बॉम्बे जिमखान्याला 20 षटकांत 131 धावांवर रोखताना प्रभावी गोलंदाजी केली. प्रणव केला याच्या अर्धशतकी खेळीमुळे बॉम्बे जिमखाना संघाने चांगली धावसंख्या उभारली. त्याने 43 चेंडूंत पाच चौकारांसह 52 धावा केल्या. आशय दुबेने २१ धावांचे योगदान दिले. पारसी जिमखान्याच्या सागर उदेशने 19 धावांत 3 आणि शम्स मुलाणीने 23 धावांत 2 विकेट घेतल्या.
विजयासाठीचे 132 धावांचे माफक लक्ष्य पारसी जिमखाना संघाने 16.5 षटकांत 3 विकेट गमावून पार केले. त्यांच्याकडून सलामीवीर केविन डी’आल्मेडाने 33, आदित्य तरेने 24 आणि सचिन यादवने नाबाद 33 धावा करून संघाला विजय मिळवून देत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.