खारगांव : महाराष्ट्राला नवख्या असणाऱ्या स्लॅलम (कयाकिंग) या क्रीडा प्रकारात अमरावतीच्या जान्हवी राईकवारने मंगळवारी ब्रॉंझपदकाची कमाई केली. या स्पर्धा प्रकाराचा खेलो इंडिया स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आला असून, महाराष्ट्रानेही अगदी ऐनवेळी या स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला. मुळ अमरावतीची असली, तरी भोपाळ येथे सराव करणाऱ्या जान्हवीने याच सरावाचा आपल्याला फायदा झाल्याचे सांगितले. पदार्पणातच पदकाला गवसणी घातल्याने आनंद झाला आहे. आता या खेळात अधिक प्रगती करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे तिने सांगितले.
"महाराष्ट्राने सहा महिन्याच्या अल्पशा तयारीनंतर पहिल्याच स्पर्धेत ब्रॉंझपदकापर्यंत मजल मारली. महाराष्ट्राकडे गुणवत्ता भरपूर आहे. पण, या खेळासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण आणि सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे", अशी प्रतिक्रिया जान्हवीच्या प्रशिक्षक पूजा पडोळे यांनी व्यक्त केली.
सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पात्रात सरावासाठी चांगली जागा असूनही केवळ सुविधे अभावी आपल्याला बाहेर जावे लागत आहे. जान्हवी याचे उत्तम उदाहरण आहे. सहा महिन्यापूर्वी तिने सरावाला सुरुवात केली. स्पर्धापूर्व तयारीसाठी एक महिना जान्हवीला भोपाळमध्ये जावे लागले. स्पर्धाही भोपाळमध्येच असल्यामुळे येथिल सरावाचा फायदा झाला, असेही प्रशिक्षक पूजा म्हणाल्या.
कॅनॉइंग आणि कयाकिंग हा खेळ साहसी असून सर्वाधिक प्रमाणात पर्वतराजीत जास्त खेळला जातो. पण, आता महाराष्ट्रातही हा खेळ खेळला जाऊ शकतो. मर्यादित सुविधेतही महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या कामगिरीचे येथे कौतुक झाले. या सुविधांमध्ये वाढ झाल्यास आणि चांगले प्रशिक्षण मिळाल्यास आपले खेळाडू भविष्यात नक्कीच पदकाचा रंग बदलू शकतील, असा विश्वासही पूजा यांनी व्यक्त केला.
Tags
क्रीडा