पाचशे कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप

 



महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांचा उपक्रम 

डोंबिवली / शंकर जाधव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने डोंबिवली येथे ५००  कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच सेफ्टी वाटप गुरुवारी करण्यात आले.महाराष्ट्र जनरल मजूर संघटनेच्या प्रयत्नामुळे हे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव माणिकराव मिसाळ, शिवसेना डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, रिपब्लिकन नेते माणिक उघडे, वपोनी पंढरीनाथ भालेराव, सहायक आयुक्त भरत पाटील,  तळेकर, पायल मार्बलचे सुरेश जैन, समाजसेवक रवी शेट्टी, मजदूर संघटनेचे  खजिनदार विश्वनाथ रेवगडे, युवा अध्यक्ष नामदेव भानुसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

    याबाबत लक्ष्मणराव मिसाळ म्हणाले, नोंदणी कृत कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती म्हणून पहिली ते सातवी अडीच हजार रुपये, नववी ते दहावी पाच हजार रुपये,  अकरावी- बारावी दहा हजार रुपये ,तेरावी चौदावी पंधरावी साठी वीस हजार रुपये, तर  इंजिनिअरिंग साठी साठ हजार रुपये आणि वैद्यकीय शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी एक लाख रुपये शासनाच्या वतीने देण्यात येत आहेत. तसेच कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये संघटनेच्या वतीने मिळवून देण्यात आलेले आहेत. कामगारांच्या पत्नीच्या बाळंतपणासाठी नॉर्मल असेल तर पंधरा हजार आणि सिझेरियन साठी वीस हजार रुपये देण्यात येत आहेत. प्रत्येक कामगाराला पाच लाखाचा मोफत विमा संघटनेच्या वतीने मिळवून देण्यात येत आहे. गंभीर आजारांसाठी एक लाख रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. तर एखादा कामगार कर्तव्यावर असताना अपघात झाल्यास 75 टक्के अपंगत्व आल्यास, दोन लाखाची आर्थिक मदत शासनाच्या वतीने देण्यात येते. संघटना त्यासाठी प्रयत्नशील असते. अशा ३०  योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना संघटना देते संघटनेचे दहा हजार सभासद असून दिड  ते दोन हजार सभासदांची शासन दरबारी नोंदणी करण्यात आलेली आहे. गुरुवारी वाटप करण्यात आलेल्या सुरक्षा किट मध्ये कामगारांसाठी ड्रेस ,हेल्मेट ,सेफ्टी बेल्ट ,ग्लोज , चटई, मच्छरदाणी, बॅग, जेवणाचा डबा,  पाणी बाटली , टॉर्च आणि हे सगळं ठेवण्यासाठी एका लोखंडी पेटी देण्यात आली आहे.सदर कार्यक्रमात संघटनेचे कार्यालय प्रमुख कारभारी रेगडे, नाका अध्यक्ष रामेश्वर शेजुळ, कार्याध्यक्ष भीमराव गुंड, महिला शहरप्रमुख वंदना जाधव,  कुर्ला शहर प्रमुख संदीप येवले इत्यादी पदाधिकारी, मजदूर संघटनेचे सभासद,  डोंबिवलीतील नागरिक उपस्थित होते. डोंबिवली पूर्व येथील मजदूर संघटनेच्या स्टेशन जवळील कार्यालयाबाहेर  हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.



Post a Comment

Previous Post Next Post