मराठीत लिहा, मराठी वाचा आणि मराठीतच बोला
दिवा : मराठी भाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी, स्वामीराज प्रकाशन, श्रीरंग थिएटर, डोंबिवली आणि कल्याण काव्य मंचच्या सहकार्याने "शब्दोत्सव" हा मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव पुन्हा एकदा कल्याण महिला मंडळ सभागृहात हा महोत्सव सकाळी १० ते रात्रौ ८ वाजे पर्यंत रंगणार आहे. सलग १० तास, ८० कलावंत मराठी साहित्यातील निवडक कथा, कविता, कादंबरी, अंश, नाटक आदींचे अभिवाचन करणार आहेत. या महोत्सवात कल्याण काव्य मंच, श्रीरंग थिएटर- डोंबिवली, कल्याण सार्वजनिक वाचनालय, अभिव्यक्ती-ठाणे, कथाकथन, संस्था- ठाणे, साहित्य गंध-कल्याण, चार मित्र-कल्याण, विवक्षा- कल्याण, सफल- कल्याण, नाट्य रसिक हो- कल्याण, मंच मंथन- डोंबिवली, आकांक्षा क्रिएशन -कल्याण या संस्थांचे अभिवाचक सहभाग नोंदवणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिध्द मालिका दिग्दर्शक राजू सावंत यांचे हस्ते होणार आहे. गझलकार प्रशांत वैद्य, भिकू बारस्कर, साहित्यिक व रंगकर्मी आणि सचिव, कल्याण सार्वजनिक वाचनालय, सुप्रसिध्द रंगकर्मी सुनील देवळेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
चौकट
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व तात्यासाहेब शिरवाडकर "कुसुमाग्रज" यांचा जन्म दिवस म्हणजेच "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून उस्फूर्तपणे संपूर्ण महाराष्ट्र साजरा करीत असतो. स्वामीराज प्रकाशन, सन मार्च २०२२ पासून, प्रत्येक महिन्याच्या २७ तारखेला "मराठी आठव दिवस" साजरा करीत आहे. "मराठी लिहा, मराठी वाचा आणि मराठीतच बोला..." एवढे साधे सूत्र यामागे आहे. दर महिन्याच्या २७ तारखेला महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्याही शहरात, गावात जाऊन मराठी माणसांना एकत्र करत, त्यांच्यासाठी मराठीतून काहीतरी सादर केले जाते. जे असते फक्त मराठी आणि मराठी ! कोल्हापूर येथून या उपक्रमाला सुरुवात झाली आणि ही वारी कणकवली गोवा, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, शिर्डी, बेळगाव, नालासोपारा,
कल्याण, कुडाळ येथे गेली आहे.
समस्त कल्याण, डोंबोवलीकर रसिक आणि साहित्यप्रेमींनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी आणि "मराठी भाषा गौरव दिन" साजरा करावा असे आवाहन आयोजक आणि महोत्सव संयोजक यांनी केले आहे.
कार्यक्रम स्थळ: कल्याण महिला मंडळ, बाजारपेठ मार्ग, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर जवळ, कल्याण (प) -४२१ ३०१
वेळ : सकाळी १० ते रात्रौ ८