- ठाकरे गटाला मोठा धक्का
- निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना धक्का देत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या निर्णयाचे शिंदे गटाकडून स्वागत केले जात आहे, तर उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचे संकेत दिले आहेत.
आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता.
एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. यानंतर मागील आठ महिन्यांपासून निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती. ही सुनावणी आता पूर्ण झाली असून बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपैकी 76% मते शिंदेंबरोबर असलेल्या आमदारांना मिळाली होती. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना 23.5% मते मिळाली होती," असे या प्रकरणात दिलेल्या आदेशात आयोगाने म्हटले आहे.
खरी शिवसेना कोणाची तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे याबाबत निवडणूक आयोगाने ठाकरे तसेच शिंदे गटाला आपापली बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी दोन्ही गटांना पदाधीकारी तसेच पक्षातील अन्य महत्त्वाच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध करा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले दिले होते. त्यानंतर दोन्ही गटाने पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असलेली कागदपत्रं निवडणूक आयोगासमोर सादर केली होती.