डोंबिवली / शंकर जाधव : सांगली येथे महाराष्ट्रात प्रथमच झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सांगलीची प्रतीक्षा बागडी व कल्याणजवळील मंगरूळ गावातील वैष्णवी पाटील यांच्यात अंतिम सामन्यात लढत झाली. सामन्यात वैष्णवी पाटील ही उपविजेती ठरली. गावात महिला कुस्तीपटू म्हणून वैष्णवीची ओळख होती. कुस्तीचे धडे शिकत ती आपले शिक्षण पूर्ण करत आहे. वैष्णवीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 27 गाव संघर्ष समितीचे पदाधिकारी गुलाब वझे, शरद पाटील, जालिंदर पाटील, विजय पाटील, वासुदेव पाटील, रंगनाथ ठाकूर, विषवनाथ रसाळ, निलेश म्हात्रे,पांडुरंग म्हात्रे यांनी मंगरूळ गावात वैष्णवीचा शाल ,पुष्पगुच्छ व ५१ हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार केला.महिला महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमुळे कल्याणची वैष्णवी पाटील हिची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली.
कल्याण जवळील मांगरूळ गावची पैलवान म्हणून नावारूपास आलेली वैष्णवी दिलीप पाटील नांदिवली येथील जय बजरंग कुस्ती प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षक पंढरीनाथ ढोणे, सुभाष ढोणे, प्रज्वल ढोणे, वसंत साळुंखे व अन्य वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. लहानपणापासूनच कुस्तीची आवड आणि आतापर्यंत सहा ते सात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारी वैष्णवी पाटील महाराष्ट्र केसरीच्या पहिल्या स्पर्धेमध्ये पोहचली. वैष्णवी पाटील हिला वडील दिलीप पाटील आणि आई पुष्पा पाटील यांचाही घरामधून पहिल्यापासूनच कुस्ती – पैलवानकीचा ओढा होता. मुलीला राज्य राष्ट्रीय पातळी पर्यंत तसेच आंतरराष्ट्रीय पातळी पर्यंत त्यांनी बाळगलेला स्वप्न मला पूर्ण करायचा असून महाराष्ट्र केसरी ह्या स्पर्धेपर्यंतच मला न थांबता मला आंतरराष्ट्रीय आणि ऑलम्पिकपर्यंत पोहचायचे आहे असे वैष्णवीने सांगितले.