1 मेपासून मित्सु शोजी टी-ट्वेन्टी क्रिकेट लीगचा नववा हंगाम

 

मुंबई : मुंबई क्रिकेट क्लब (एमसीसी), ज्वाला फाउंडेशन आणि मित्सु शोजी आयोजित मित्सु सोजी टी-ट्वेन्टी क्रिकेट लीगचा नववा हंगाम 1 मे 2023पासून सुरू होत आहे. बांद्रा हिरोज्, घाटकोपर जेट्स, मुंबई पोलीस सिटी रायडर्स, शिवाजी पार्क हिरोज् आणि ठाणे मराठा अशा पाच संघांमध्ये खेळल्या जाणार्‍या स्पर्धेची सलामीची लढत मुंबई पोलीस जिमखाना मैदान, मरिन लाइन्स येथे 1 मे रोजी दु. 1 वा. खेळली जाईल. अंतिम सामना 20 मे रोजी याच मैदानावर होईल.

मुंबई शहर आणि उपनगरांतील युवा आणि प्रतिभावंत खेळाडूंना चांगले व्यासपीठ देण्यादृष्टीने मुंबई क्रिकेट क्लब (एमसीसी), ज्वाला फाउंडेशन गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. कोरोना महामारीमुळे पुन्हा मित्सु शोजी टी-ट्वेन्टी क्रिकेट लीग खेळली जात असल्याचा मनस्वी आनंद आहे. या लीगच्या माध्यमातून क्रिकेटमधील नवे टॅलेंट शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे. 2011मध्ये ही लीग सुरू केली तेव्हा मुंबईत फारशा टी-ट्वेन्टी स्पर्धा किंवा लीग नव्हत्या. मात्र, आता अनेक स्पर्धा/लीग होत आहेत. याचा आनंद आहे. या स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीमध्ये आमचे स्पॉन्सर, मित्सु शोजी, एएनएम आणि अन्क्वांट तसेच कर्णधार, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, प्रेक्षक आणि प्रसारमाध्यमांचा मोठा वाटा आहे, असे मित्सु सोजी लीगचे संस्थापक ज्वाला सिंग यांनी शुक्रवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मित्सु शोजी टी-ट्वेन्टी क्रिकेट लीगमधील सामने मुंबई पोलीस जिमखाना मैदानासह ओव्हल मैदान आणि एअर इंडिया मैदान, कलिना येथे खेळवले जाणार आहेत. लीगमध्ये एकूण 2 लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यात प्रत्येक सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला मिळणार्‍या रोख अडीच हजार रुपयांच्या पारितोषिकाचा समावेश आहे. लीगच्या अंतिम फेरीला श्रीलंकेचे माजी वेगवान गोलंदाज चमिंडा वास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मित्सु शोजी टी-ट्वेन्टी क्रिकेट लीगला दक्षिण कोरियामध्ये वास्तव्यात असलेले भारतातील उदयोगपती लाल भारवानी यांचा कायम पाठिंबा राहिला आहे. लीगच्या पहिल्या हंगामापासून ते लीगशी जोडलेले आहेत. लीगच्या इथवरच्या वाटचालीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे, असे ज्वाला सिंग पुढे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post