अनधिकृत मशिदीसाठी ३० एप्रिलचा अल्टीमेटम

 


मनसेच्या अविनाश जाधवची मुंब्र्यात धडक 

ठाणे :  अनधिकृत मशिदीविरोधात आवाज उठवणारे मनसे नेते अविनाश जाधववरील बंदी उठताच त्याने मुंब्य्रात धडक मारली. मुंब्र्यातील मनसे पदाधिकारी राजू गायकवाड यांच्या घरी भेट घेतली. मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत दर्गे व मजारवर येत्या ३० एप्रिलपर्यंत प्रशासनाने कारवाई करावी. अन्यथा, मनसे स्टाईल पुढचे पाऊल उचलणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मनसेच्या या पवित्र्याने पोलीस व वनविभाग सतर्क झाला असून तुर्तास कारवाईचे आश्वासन देण्यात आल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.

    गुढी पाडव्याच्या मुंबईतील मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत मशिदींचा मुद्दा उचलला होता. त्यानंतर, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत दर्गे व मजारचा पर्दाफाश करून कारवाईची मागणी केली होती. कारवाई केली नाही तर त्या मशिदींशेजारी मंदिर उभारण्याचा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. मात्र, कारवाई करण्याआधीच रमजान - ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत ठाणे पोलिसांनी फतवा काढून अविनाश जाधव यांनाच मुंब्य्रात प्रवेश बंदी केली होती. 

अनधिकृत बांधकामांचा विषय ज्वलंत असून मी हा विषय कधीच सोडलेला नाही आणि याबाबत मी सातत्याने माझ्या भूमिकेची आठवण करून देत राहणार असल्याचे यावेळी अविनाश जाधवने सांगितले. तर ठाणे शहरातील सौंदर्यता टिकून राहावी हाच माझा उद्देश असून या संदर्भात वनअधिकारी यांची भेट घेतली आहे व त्यांनी देखील ३० एप्रिलपर्यत वेळ मागितला आहे. ३० एप्रिलपर्यत कारवाई करण्याचे आश्वासन वनविभागाने दिलेले असल्याने जर, कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईल पाऊल उचलणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.

Tag : # अविनाश जाधव # ठाणे पोलीस # मुंब्रा मनसे

Post a Comment

Previous Post Next Post