डोंबिवली / शंकर जाधव : शिवसेना - भाजपच्यावतीने डोंबिवलीत काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदान येथून ढोल- ताशांच्या गजरात यात्रा निघाली. यात्रेच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा असलेला ट्रक फुलांनी सजविला होता.
यात्रेत सर्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नंदू परब, माजी नगरसेविका मनीषा धात्रक,पूनम पाटील, मनीषा छल्लारे, मनीषा राणे, वर्षा परमार, संजय देसले, दत्ता माळेकर, मितेश पेणकार,शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे, महेश पाटील, सुजित नलावडे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, संतोष चव्हाण, अमोल पाटील विशाल शेटे, भाई पाणवडीकर, कैलास सणस, स्वाती मोहिते ,सागर दुबे आदीसह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणाले, स्वातंत्रवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. वारंवार सांगूनही राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान करत आहेत, हे अतिशय निंदनीय आहे. याचा निषेध म्हणून सर्व ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणारे देशभक्त गौरव यात्रा काढत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशासाठी काय योगदान आहे हे राहुल गांधींना कळलेच नाही. युपीएच्या सर्व घटकांना या सर्वात कुठेतरी राजकारण करायचे आहे असे दिसत आहे, म्हणून सावरकर प्रेमी या गौरव यात्रेत सहभागी झाले आहेत. केंद्रीय व राज्यातील नेत्यांनी गौरव यात्रा काढण्यास सांगितल्या आहेत. राहुल गांधी यांच्या विधानाबाबत आम्ही निषेध व्यक्त करतो, कोण रोहीत पवार ? मी त्याला ओळखत नाही. ज्याला स्वातंत्रवीर सावरकर कोण आहे, हे माहीत नाही त्याच्याबद्दल काय बोलणार?
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे म्हणाले, नागरिक गौरव यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. सावरकरांचे स्वातंत्र चळवळीत सर्वात मोठे योगदान होते.आज ज्यांना स्वातंत्रवीर सावकार कळलेच नाही ते आक्षेपार्ह विधान करत आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.आपण पाहत असाल तर रोज सकाळी शिव्या शाप देण्याचे काम होतेय, हे महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते.कधी विचार करू शकत नाही असा तख्तापालट झाला आहे.त्यामुळे त्यांची आगपाखड होत आहे.आज जे मोठ्या मोठ्या सभा घेत आहे त्यांनी आधी अडीच वर्षात काय काम केले आहे ते जनतेला सांगावे.