डोंबिवलीकरांकडून उत्फुर्त प्रतिसाद
डोंबिवली / शंकर जाधव : विदेशातील बुक स्ट्रीट संकल्पना प्रत्यक्षात डोंबिवलीतील फडके रोडवर।पै फ्रेन्ड्स लायब्ररीचे सर्वेसर्वा पै यांनी साकारल्याने वाचकप्रेमी डोंबिवलीकरांनी याचे स्वागत केले. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून हा आगळावेगळा उपक्रम होता. रविवारी सकाळी सकाळीच सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांची पावले फडकेरोडवर वळली होती. ज्याप्रमाणे चैत्र गुढीपाडवा आणि दिवाळी पहाट दिनी जशी गर्दी दिसून येते तशीच थोडी फार गर्दी बुक स्ट्रीट उपक्रमाला झाली होती. शहरातील सारस्वतांच्या उपस्थिती बरोबर डोंबिवलीकर पुस्तकप्रेमींनी या उपक्रमात रांगेत येऊन आवडते पुस्तके घेतले. सुमारे एक लाख पुस्तके फडके रोडवर मांडण्यात आली होती.
पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे आयोजित बुक स्ट्रीटला वाचकप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डोंबिवलीत प्रथमच नदी सारखी पुस्तके रस्त्यावर मांडण्यात आल्याने हे चित्र सर्वांसाठी वेगळे होते. बदलापूर, ठाणे, कल्याण विभागातील पुस्तक वाचक लोकं या निमित्ताने डोंबिवलीत आली होती. शाळांच्या सुट्ट्यामुळे पालकांबरोबर मुलेही होती. पाच ते सहा हजार पुस्तकप्रेमींनी बुक स्ट्रीट उपक्रमाचा आनंद घेतला.
पूर्वेकडील मदन ठाकरे चौक ते अप्पा दातार चौक अशा सुमारे २५० मीटरच्या रस्त्यावर लाल गालिच्यावर पुस्तके मांडलेली होती. आजूबाजूला ऐसपैस जागा ठेवून पुस्तक न्याहाळता येत होते. डोंबिवली साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पै फ्रेन्ड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांच्या उपस्थितीत बुक स्ट्रीटचे उद्घाटन करण्यात आले.
याविषयी पुंडलिक पै यांनी सांगितले की, विदेशात अनेक शहरांमध्ये काही भागात एक दिवस पुस्तकांसाठी असा उपक्रम होत असतो. स्पॅनिश पुस्तक प्रेमी लुझ इंटरप्युटस यांची ही संकल्पना. एक दिवस रस्त्यावरील वाहनांचा गोंगाट, प्रदूषण, गर्दी कमी करून त्याऐवजी तो दिवस साहित्यिक, वैचारिक देवाण घेवाण, पुस्तक अदान प्रदान, शांतता यासाठी राखीव असावा. या उद्देशातून लुझ यांनी रस्त्यावर पुस्तके मांडून ती वाचकांना भेट देण्याचा, यानिमित्ताने साहित्यिक मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. लोकांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी हा उपक्रमामागील उद्देश आहे.
पुंडलिक पै हे पेंढरकर विद्यालयातील माझे विद्यार्थी आहेत. आपल्या विद्यार्थ्यांनी असा उपक्रम हाती घेतला याचा आनंद होत आहे. संपुर्ण समाज्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा प्रयत्न खरोखरीच अतुलनीय असाच आहे. समाजाचा वैचारिक स्तर उंचावयाचा असेल तर समाजाला पुस्तकांशी जोडून देणे अतिशय महत्वाचे आहे. आज समाजाची नैतिक आणि वैचारिक परिस्थिती खूप घालवलेली आहे. यामध्ये बदल घडविण्यासाठी सकस वाचनाची गरज आहे. अशा पुस्तक प्रदर्शनातून लोकांनी पुस्तके घ्यावी आणि वाचन करावे. पुंडलिक पै यांनी ही संधी हजारो लोकांना या निमित्ताने दिली आहे.
श्याम अत्रे ( पेंढरकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य )
पुंडलिक पै यांनी वाचकांसाठी घेतलेली मेहनत फार मोठी आहे. येथील गर्दी ही या उपक्रमाची फलसृती आहे हे डोंबिवलीकरांचं भाग्य आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाने वेगळा आनंद मिळतो. नवीन पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी पै मेहनत घेत आहेत. या उपक्रमाची प्रेरणा घेऊन इतर शहरातून असे उपक्रम निश्चित होतील असा विश्वास वाटतो.
गुलाब वझे, माजी स्वागताध्यक्ष
(अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन डोंबिवली )




