पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त झाले पाहीजे

 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश 

ठाणे :  शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी तसेच शहरात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ठाण्यातील निवासस्थानी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरात आणि एमएमआर क्षेत्रात सुरू असलेली विकासकामे १ जून पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले. तसेच शहरातील रस्ते खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजनांवर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. 

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचना संबंधित प्रशासकीय यंत्रणांना दिल्या. तसेच हा रस्ता कुणाच्या मालकीचा आहे याचा विचार न करता त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. एमएमआर क्षेत्रात सुरू असलेली विकासकामे मान्सून येण्याच्या अगोदर पूर्ण करावी असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिले. पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी करावयच्या उपाययोजना आतापासूनच हाती घेण्याच्या सूचना संबंधित सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

भिवंडी-कशेळी मार्गावरील एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेले काम ६० टक्के पूर्ण झाले असून मॉन्सून पूर्व हे काम १०० टक्के पूर्ण करावे. तसेच भिवंडी शहरातील जे रस्ते खराब आहेत त्यांची डागडुजी तात्काळ एमएमआरडीएच्या माध्यमातून करून घ्यावी, साकेत खारेगाव पुलावर होणारी कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातून या मुंबई नाशिक महामार्गावर सुरू असलेले २ अधिक २ सर्व्हिस रोड मान्सूनआधी पूर्ण करावेत त्याचप्रमाणे गरज वाटल्यास रात्रंदिवस काम करून अतिरिक्त मनुष्यबळ वापरण्याच्या सूचना देखील यासमयी दिल्या. ठाणे- नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीदरम्यान अनेकदा काल्हेर ते आंजूर दिव्यादरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या पाईपलाईन रोडचा वापर केला जातो ह्या पाईपलाईन रोडची डागडुजी ताबडतोब करून तो सुस्थितीत आणण्याच्या सूचना देखील याप्रसंगी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना देण्यात आल्या.

ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीतील घोडबंदर मार्गावरील गायमुख वाघबीळ मार्गावर बाजूकडील पट्ट्यांचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले असून ते वेळेत पूर्ण करावे तसेच घोडबंदर रोड आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील सर्व्हिस रोड आणि महमार्ग दोन्ही वापरात आणावे अशा सुचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. पुढील महिनाभर शहरातील वाहतूक नियमनाच्या कामावर असलेला ताण पाहता ठाणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक पोलिसांना अतिरिक्त वाहतूक वोर्डन उपलब्ध करून द्यावे तसेच मुंबईतून अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घ्यावी असे निर्देश देखील यावेळी देण्यात आले.  

मान्सूनपूर्व कामे वेळेच्याआधी आणि उत्तम दर्जाची असावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेणार नाही असेही यावेळी स्पष्ट केले. आपल्या अखत्यारीतील रस्त्यावर खड्डे राहणार नाहीत याची जबाबदारी त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांची असेल. तरीही कुणाकडून हयगय झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असेही यासमयी स्पष्ट केले.

या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंह, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, एमएसआरडीसीचे सह- व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.पंजाबराव उगले, वाहतूक विभागाचे उपायुक्त अनिल राठोड आणि सार्वजनिक बांधकाम, एमएमआरडीसीचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 



Post a Comment

Previous Post Next Post