लव्ह जिहाद नावाने होणारे हिंदू भगिनींवरील धर्मसंकट रोखण्याची मागणी
डोंबिवली/ शंकर जाधव : डोंबिवली जवळील डायघर येथे सकल हिंदू समाज तर्फे हिंदू जनजागरण धर्मसभेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. लव्ह जिहाद नावाने हिंदू भगिनींवरील धर्मसंकट रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे या माध्यमातून काही प्रमुख मागण्या केल्या जाणार आहेत. या सभेसाठी हजारोच्या संख्येने हिंदू बंधु-भगिनी येथील असा विश्वास आयोजकांना आहे. या सभेसाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण मैदान खचाखच भरेल अशी माहिती सकल हिंदू समाज तर्फे लक्ष्मण पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.या सभेत सुमारे २५ हजार लोकांसाठी बसल्याची सोय करण्यात आली असल्याचे सांगितले.
कल्याण-शीळ रोडवरील पं.पु.स्वामी.डी.के.दास महाराज क्रीडांगण डायघरगाव, पो. पडले, ता. जि. ठाणे येथे या हिंदू जनजागरण धर्मसभेचे आयोजन केले आहे. ही सभा रविवार 30 एप्रिल रोजी दुपारी 5 वाजता होणार आहे. या सभेचा मुख्य उद्देश म्हणजे लव्ह जिहाद नावाने हिंदू भगिनींवरील होणारे धर्मसंकट रोखले पाहिजे. तसेच श्रध्दा वालकर या हिंदू भगिनींचा मारेकरी आफताब याला फाशीची शिक्षा व्हावी. लव्ह जिहाद, धर्मांतरण व लँड जिहाद विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या प्रमुख मागण्या आहेत. सर्व हिंदू बंधु-भगिनींनी राजकीय हेवे-दावे सोडून एक दिवस हिंदू म्हणून या हिंदू जनजागरण धर्म सभेत सामील व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकल हिंदू समाज तर्फे गेल्या दिड महिन्यांपासून या सभेची तयारी सुरू आहे. आता संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. धर्मांतर आणि लव्ह जिहाद हे विषय सभेपुढे मांडण्यात येणार आहेत. जनजागरण होवून महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने या विरोधात कडक कायदा व्हावा असा उद्देश आहे. ही सभा कोणत्याही राजकीय पक्षाची नसून सकल हिंदू समाजाची आहे. राजकीय, सामाजिक आणि संपूर्ण धर्माची मिळून सभा आयोजित केली आहे. या सभेसाठी वक्ते म्हणून काजलताई हिंदुस्तानी, मुनीमजी, भारतानंद स्वरस्वती येणार आहेत. तसेच या सभेसाठी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह कल्याण तालुक्यातील सर्व आमदार, सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते येणार आहेत. सुमारे पंचवीस हजार जनसमुदाय सभेसाठी बसू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य, सौचालय, पिण्याचे पाणी आदी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. दुपारी कोणालाही उन्हाचा त्रास होवू नये म्हणून संध्याकाळी पाच नंतरची वेळ सभेसाठी निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती लक्ष्मण पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी प्रवीण पावशे, विष्णू पाटील, सुखदेव पाटील, रवींद्र पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते.
स्त्री सुरक्षा, अवैध घुसखोरी, अवैध बांधकाम, अवैध व्यवसाय, सामाजिक तेढ निर्माण करणे, साधूसंत हत्या, व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणे, अमली व अवैध गोष्टींची तस्करी व विक्री, गोहत्या आदी विषयांवर सभेत विश्लेषण होणार असल्याचेही सांगण्यात आले.